लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; १.७५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
मुंबई, (प्रतिनिधी): गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी १.७५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिधावाटप व नागरी पुरवठा विभागाच्या मुख्य निरीक्षण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. विनायक वसंत निकम (मुख्य निरीक्षण अधिकारी, नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुख्यालय, चर्चगेट, मुंबई) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे कांदिवली येथील एका गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात आणि त्यांच्या नातेवाईकांची ठाणे येथे गॅस एजन्सी आहे. दोन्ही एजन्सीवर ऑक्टोबर आणि ऑगस्ट २०२४ मध्ये कारवाई करण्यात आली होती. याच कारवाईच्या अनुषंगाने, आरोपी विनायक निकम यांनी तक्रारदाराला संपर्क साधून कार्यालयात बोलावले.
१७ जुलै २०२५ रोजी झालेल्या भेटीत, निकम यांनी तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दरमहा १.५ लाख रुपये आणि त्यांच्या नातेवाईकांच्या एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दरमहा १ लाख रुपये, असे एकूण २.५ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी इतकी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर तडजोडीअंती, आरोपीने दोन्ही एजन्सीसाठी दरमहा १.७५ लाख रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २५ जुलै २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, २९ जुलै २०२५ रोजी एसीबीने सापळा रचून आरोपी विनायक निकम यांना तक्रारदाराकडून १.७५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
ACB Raid
Bribery Case
Government Official Arrest
Mumbai Corruption
#ACBRaid #MumbaiACB #Bribery #Corruption #MumbaiNews #AntiCorruption #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: