संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंचांचा समावेश
आश्वासनापेक्षा अधिक विकास करून दाखवू - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
मुंबई, (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेश सोहळ्यात माजी पंचायत समितीचे ४ सदस्य, १२ सरपंच, ८ माजी सरपंच तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज ज्या विश्वासाने या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अपेक्षेपेक्षा अधिक विकास या परिसराचा आम्ही करून दाखवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की, भाजपाच्या विचारधारेवर आणि विकासावर जनतेचा विश्वास निर्माण झाल्यामुळेच हे सर्वजण पक्षात आले आहेत. आगामी काळात तालुक्यातून दोन आकडी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ भला, दत्ता हंबीर, पिंटू फसाले, संदीप थोराड, तसेच शरद पवार गटाचे अमित हरड, सचिन सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले.
BJP
Maharashtra Politics
Ravindra Chavan
Shahapur
Political Defection
#BJP #MaharashtraPolitics #RavindraChavan #Shahapur #PoliticalDefection

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: