पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘सावली’ निवारा केंद्राने बेघर, निराधार आणि मानसिक-शारीरिक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी एक नवा आशेचा किरण निर्माण केला आहे. 'रिअल लाइफ, रिअल पीपल' या संस्थेच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या या केंद्राने केवळ निवाराच नाही, तर प्रेम आणि सन्मानाचे जीवन देण्याचे काम केले आहे. नुकतीच या केंद्राला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.
‘सावली’ केंद्रामध्ये सध्या विविध वयोगटातील निराधार पुरुष आणि महिलांना सुरक्षित निवारा, जेवण, औषधोपचार आणि समुपदेशन सेवा मोफत दिली जात आहे. अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना "तुम्ही येथे कसे पोहोचलात?" अशी आपुलकीने विचारपूस केली. त्यावर लाभार्थ्यांनी केंद्रातील सोयीसुविधांवर समाधान व्यक्त करत "हे केंद्र म्हणजे आमचा परिवार आहे" अशा भावना व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान, जांभळे पाटील यांनी केंद्रातील सुविधांची पाहणी केली आणि आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले. केंद्रात रॅम्पची व्यवस्था, रुग्णालयात नेण्यासाठी वाहन आणि वीज गेल्यास बॅटरी बॅकअपची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच, लाभार्थ्यांना अधिकाधिक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचेही त्यांनी सांगितले.
‘सावली’ केंद्रातील एका लाभार्थ्याचे उदाहरण प्रेरणादायी आहे. जांभळे पाटील यांनी सुमारे ८-९ महिन्यांपूर्वी एका बेघर व्यक्तीची माहिती संस्थेला दिली होती. त्या व्यक्तीला केंद्रात निवारा मिळाल्यानंतर आज ती उदबत्ती आणि पूजा साहित्य विकून स्वावलंबी झाली आहे. या कामामुळे समाधान व्यक्त करताना जांभळे पाटील म्हणाले की, ‘सावली हे केवळ निवाऱ्याचं केंद्र न राहता, माणुसकीच्या नात्यांनी बांधलेली एक सशक्त व्यवस्था बनत चालली आहे.’
या केंद्राची दखल राज्य शासनाच्या निवारा सनियंत्रण समितीनेही घेतली असून, ‘त्रिशरण एनलायनमेंट फाउंडेशन’ने सादर केलेल्या अहवालानुसार, ‘सावली’ हे केंद्र महाराष्ट्रातील सर्वोत्तम निवाऱ्यांपैकी 'प्रथम क्रमांकावर' असल्याचे घोषित करण्यात आले आहे. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. ए. हुसैन, व्यवस्थापक गौतम थोरात यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Saavli Shelter Home
Homeless Support
Social Initiative
Pradeep Jambhale Patil
#PCMC #SaavliCenter #HomelessShelter #SocialWork #PimpriChinchwad #CommunitySupport #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: