बोर घाटात २४ तास विशेष पथके तैनात; एसटी बस चालक-वाहकांची होणार अल्कोहोल चाचणी
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके
नवी मुंबई, (प्रतिनिधी): गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहनांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी केले आहे. गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाअंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 'डेल्टा फोर्स' व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतूक नियंत्रण सूचना फलक इत्यादी लावण्यात आले आहेत. घाट क्षेत्रातील दरड कोसळणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
बोर घाटात अपघात झाल्यास वाहतूक नियंत्रण व नियोजन करण्यासाठी चार ठिकाणी घाट निरीक्षक प्रतिसाद पथक २४ तास तैनात करण्यात आले आहे. तसेच, माणगाव आणि इंदापूर एसटी डेपोच्या परिसरातील बसेसच्या पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. अपघात टाळण्यासाठी त्यांची अल्कोहोल चाचणीही करण्यात येणार आहे.
Ganeshotsav
Navi Mumbai
Traffic Management
Road Safety
MSRTC
#Ganeshotsav #NaviMumbai #TrafficManagement #RoadSafety #MSRTC
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: