‘मांसाहार बंदीमुळे महाराष्ट्र नपुंसक बनतोय’ या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक; संजय राऊत यांनी माफी मागावी
माफी मागितली नाहीतर महाराष्ट्र मर्दानगी काय आहे हे दाखवून देईल - नवनाथ बन
मुंबई (प्रतिनिधी): १५ ऑगस्टच्या मांस विक्री बंदीवर भाष्य करताना 'मांसाहार विक्री बंदी करून तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात' असे वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वारकरी, टाळकरी, धारकरी आणि नाथ संप्रदायाची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून वारकरी, नाथ संप्रदाय आणि माळकरी समाज शाकाहार करतात, मग हे सारे संप्रदाय नपुंसक आहेत का?" राजकारण जरूर करा, पण वारकरी परंपरेचा आणि भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या वक्तव्याबद्दल राऊत यांनी लवकरात लवकर माफी मागावी, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
यावेळी नवनाथ बन यांनी ‘सामना’मधील अग्रलेखावरूनही राऊत यांचा समाचार घेतला. महायुती सरकारमध्ये ‘कु’ची बाराखडी सुरू आहे, हे राऊत यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे, असे ते म्हणाले. ‘कु’ची बाराखडी ही ‘कुचकामी’, ‘कृतघ्न’, ‘कुविचारी’ अशा प्रकारे ‘उबाठा’ आणि संजय राऊत यांनाच लागू होते, अशी खिल्ली त्यांनी उडवली. महायुती सरकार ‘विकास’ची बाराखडी राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रा चाळ घोटाळ्यावरूनही त्यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. "पत्रा चाळ घोटाळा करणाऱ्यांना मराठी माणसांबद्दल गळा काढण्याचा अधिकार नाही. भाजपा विकासाचे राजकारण करते," असे ते म्हणाले. फडणवीस सरकारने बीडीडी चाळींमधील लोकांना माफक दरात घरे उपलब्ध करून दिली, तर राऊत यांनी पत्रा चाळीतील मराठी माणसाला देशोधडीला लावल्याचा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra Politics, Sanjay Raut, BJP, Navnath Ban, Meat Ban, Varkari Sampraday, Controversy, Apology
#SanjayRaut #BJP #NavnathBan #MaharashtraPolitics #MeatBan #Varkari #PatraChawlScam #Mumbai #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: