छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे मानले आभार
पिंपरी, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच पर्यटन, स्थानिक रोजगार आणि सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
दिल्लीत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार बारणे यांनी त्यांचा सत्कार केला. ते म्हणाले की, या यादीमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे. हा निर्णय महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.
युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यामुळे या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर जतन आणि संवर्धन करण्यास मदत होईल. जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या अधिवेशनात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत हा निर्णय सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. भविष्यातही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सरकार सकारात्मक प्रयत्न करत राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
UNESCO World Heritage
Shivaji Maharaj Forts
Shrirang Barne
Gajendra Singh Shekhawat
Maharashtra Tourism
#UNESCO #ShivajiMaharaj #WorldHeritage #ShrirangBarne #Maharashtra #Tourism #FortsOfMaharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: