शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅव्हल्समध्ये जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना बेड्या

 


पुणे, (प्रतिनिधी): पुण्यातील वाघोली येथे एका खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये जबरदस्तीने घुसून चालक आणि वाहकाला मारहाण करून पैशांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२४ जुलै २०२५ रोजी वाघोली येथील बकोरी फाटा परिसरात एका खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना बसवण्यासाठी उभी होती. यावेळी चार अनोळखी इसमांनी बसमध्ये येऊन चालक आणि वाहकाकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी दोघांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले आणि त्यांच्या चारचाकी गाडीतून पसार झाले. या घटनेनंतर फिर्यादींनी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी साहिल संतोष बवले, ओंकार सुरेश साकोरे, महेश विठ्ठल कवडे आणि नितांत चंद्रशेखर छपानी यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेली रोख रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.


  • Pune Police

  • Robbery Case

  • Vagholi Police Station

  • Arrest

 #PunePolice #Robbery #VagholiPolice #CrimeNews #Arrest #PuneCity #Justice

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा