द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या २५ व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा सहभाग
उरण (प्रतिनिधी) - दिव्यांगत्व म्हणजे कमतरता नाही, तर ती एक वेगळी ओळख आहे. हीच गोष्ट उरणमधील दिव्यांग बांधवांनी जगासमोर सिद्ध केली आहे. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित '२५ व्या द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन २०२५' मध्ये यंदा प्रथमच व्हीलचेअर रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत, आपल्या मनाच्या धैर्याची आणि जिद्दीची अनोखी ओळख दिली.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा १० ऑगस्ट, २०२५ रोजी बोकडविरा-चारफाटा (एन.एम.एस.ई.झेड. मैदान) येथे भर पावसात पार पडली. या स्पर्धेने केवळ वेग आणि शर्यत दाखवली नाही, तर दिव्यांग बांधवांच्या स्वप्नांचा आणि आत्मविश्वासाचा रथ जगासमोर आणला. स्पर्धकांनी स्वतःच्या मर्यादांना आव्हान देत, जिद्दीपुढे कोणताही अडथळा मोठा नसतो हे दाखवून दिले.
या ऐतिहासिक स्पर्धेत अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. त्यापैकी प्रथम क्रमांक संदेश येशुदास राजगुरू यांनी पटकावला. मिल्टन ऑगस्टीन मिरंडा यांनी द्वितीय, तर गुलाम हुसेन काझी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय, महेश पाटील यांनी चौथा आणि उमेश पाटील यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिव्यांग बांधवांचे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी कौतुक केले आणि त्यांना पुढील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. यशस्वी स्पर्धकांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने पहिल्यांदाच दिव्यांग बांधवांना आपल्या मॅरेथॉनमध्ये संधी दिल्याबद्दल उरण दिव्यांग सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले.
Sports, Social Event, Wheelchair Race, Uran, Community
#Uran #WheelchairRace #DronagiriMarathon #Divyang #Inspiration #SportsNews #CommunityEvent

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: