वाशींद पोलीस ठाणे हद्दीतील घटना
ठाणे ग्रामीण: वाशींद पूर्वेकडील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या आरोपीला ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. आरोपीकडून १,३८,००० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सागर सखाराम उबळे (वय ३७, रा. महंमत मळा अपार्टमेंट, रुम नं. २०३, राईस मिल समोर, वाशींद पूर्व, ता. शहापूर, जि. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ या वेळेत ते आपल्या पत्नीसह घर बंद करून बाहेर गेले होते. याच दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १,४६,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या गंभीर गुन्ह्याची नोंद वाशींद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२९/२०२५, भा.न्या.सं कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अनमोल मित्तल यांनी समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी पथक तयार केले. गुप्त बातमीदारांमार्फत आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी गणेश सखाराम डगळे (वय २२, रा. संकल्प अपार्टमेंट, पहिला मजला, भोंडवे नगर, वाशींद पूर्व, ता. शहापूर, जि. ठाणे) याचा २४ तासांच्या आत शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला १,३८,००० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
Labels: Thane Rural Police, Burglary, Vashind, Crime News, LCB
#ThanePolice #CrimeNews #Burglary #Vashind #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: