राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा : अजित पवार (VIDEO)

 


पुणे, दि. २६: पुणे जिल्ह्यातील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी पार्क), हिंजवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, मेट्रोची सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत, तसेच विविध विकास कामे आणि रस्त्याची कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) अतिरिक्त मुख्याधिकारी विजय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश

अजित पवार म्हणाले की, या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दूरगामी विचार करून रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करावीत. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत. नाले, ओढ्यांच्या काठावरील अतिक्रमण काढण्यासह राडारोडा काढून नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे करावेत. कामात अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी.

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करता येत्या काळात त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सद्यस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला तसेच अंडरपासखाली वाहने थांबणार नाहीत, तसेच जड आणि अवजड वाहतुकीचे नियोजन करावे. वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीकरिता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भविष्यातील शहर नियोजन आणि विकास कामे

वाढत्या नागरीकरणाचा विचार करून रस्ते, पाणी, रुग्णालये, शाळा, मलनिस्सारण प्रकल्प, कचरा, वाहतूक, प्रदूषण आदी बाबींचा शहर नियोजन आराखड्यात समावेश करावा, असेही पवार यांनी सूचित केले. कासारसाई कालवा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शिक्के कमी करण्यात येतील. मंत्रालय स्तरावरील मंजुरी प्रस्तावाबाबत संबंधित विभागाचे मंत्री, सचिव आदींसोबत बैठक घेऊन त्यामध्ये सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

आगामी काळातील पुण्याची लोकसंख्या आणि दळणवळणाच्या सुविधांचा विचार करून पुणे महानगर क्षेत्र, हिंजवडीसह औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीवर भर देणे गरजेचे आहे. पीएमआरडीएने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढल्यामुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होत आहे. त्याचप्रमाणे सर्व संबंधित विभागाने देखील अतिक्रमणासंदर्भात ठोस भूमिका घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

कामांची पाहणी आणि सादरीकरण

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुणे मेट्रो लाईन ३, स्थानक क्र. ६, क्रोमा, हिंजवडी, क्रोमा ते मेझानाईन ते लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ती ते मारुंजी रोड, मारुंजी रोड - कासार साई (कॅनॉल) विप्रो सर्कल फेज-२, विप्रो सर्कल फेज-२ - स्थानक क्र. ०३, डोहलर कंपनी, डोहलर कंपनी हिंजवडी फेज ३ माण गाव-पांडवनगर नगररचना रस्ता, नगररचना रस्ता ते प्राधिकरण आकुर्डी कार्यालयादरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

बैठकीत श्री. मांडेकर यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच्यादृष्टीने सूचना केल्या. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी १३ जुलै रोजीच्या बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. हिंजवडी आयटी पार्क परिसरात पीएमआरडीएमार्फत विकसित करण्यात येणारे रस्ते, पीएमआर क्षेत्राकरिता पाणी आरक्षण, इंद्रायणी व पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प, प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्र गावांमध्ये मलनिस्सारण प्रकल्प आदींबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले.

यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे आयटी सिटी, मेट्रो रेल लि. यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Pune, traffic jam, Ajit Pawar, Deputy Chief Minister, Hinjewadi, IT Park, PMRDA, Pimpri-Chinchwad, Pune Municipal Corporation, development works, infrastructure, encroachment, metro project, city planning

 #AjitPawar #Pune #TrafficCongestion #Hinjawadi #ITPark #PMRDA #DevelopmentWorks #PuneMetro #PimpriChinchwad #UrbanPlanning

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा : अजित पवार (VIDEO) राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा : अजित पवार (VIDEO) Reviewed by ANN news network on ७/२६/२०२५ १०:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".