उरण, ११ जुलै २०२५: निसर्गाने दिलेल्या साधन-संपत्तीचे जतन करणे तसेच प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्याप्रति प्रामाणिक राहणाऱ्या व्यक्तीमत्वांपैकी एक नाव म्हणजे 'केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य'. या संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि त्यांचे पदाधिकारी, सदस्य प्राणी-पक्षी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जीव ओतून काम करतात. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे संस्थेचे उलवे नोड अध्यक्ष आणि वन्यजीवप्रेमी सर्पमित्र विक्की देवेंद्र.
सापाच्या पिल्लांना जीवदान:
विक्की देवेंद्र यांना उलवे शिवाजीनगर येथील सिडको उद्यानामध्ये असणाऱ्या दगडांच्या आत सापांची अंडी निदर्शनास आली. या अवलिया सर्पमित्राने ती एकूण ३० अंडी त्या दगडांमधून सुखरूप बाहेर काढून, एका वाळूने भरलेल्या बंद डब्यामध्ये तब्बल २१ दिवस ठेवली. त्यानंतर त्या अंड्यांतून एकूण २८ सापांची पिल्ले जन्माला आली.
वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुटका:
या घटनेची सर्व माहिती महाराष्ट्र वन विभागाचे उरण वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. कोकरे यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सर्व सापाच्या पिल्लांना निसर्गाच्या अधिवासात मुक्त संचार करण्यासाठी जंगलामध्ये सुरक्षितपणे सोडण्यात आले. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या या कार्यात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या विक्की देवेंद्र या अवलिया सर्पमित्रावर सर्व स्तरांतून सध्या अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: