"राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय" : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


खेड येथील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण; रामदास कदम यांचा वाढदिवस साजरा

रत्नागिरी, २७ जुलै  "राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. राज्यातील एकही माणूस उपचाराविना, औषधाविना मरता कामा नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आणि तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, हा आपला अजेंडा आहे." असे प्रतिपादन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथील नूतनीकरण केलेल्या स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात राज्याच्या विकासाचे ध्येय स्पष्ट केले. सिंधुरत्न योजना सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू असेही त्यांनी सांगितले. खेड येथील नाट्यगृहाला दिलेले 'माँसाहेबां'चे नाव हे त्यांना श्रद्धांजली असल्याचेही श्री. शिंदे म्हणाले.

खेड येथील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. श्री. शिंदे यांनी कोनशिलेचे अनावरण, फित कापून, तसेच बटन दाबून रंगमंचाचा पडदा उघडून आणि श्रीफळ वाढवून नाट्यगृहाचे लोकार्पण केले. यावेळी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहराज्य मंत्री योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

नाट्यगृह म्हणजे रामदासभाईंकडून जनतेला मिळालेले 'गिफ्ट'

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सुरुवातीला रामदास कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "नाट्यगृहात येताना बाहेरील आणि आतील काम पाहिल्यानंतर ते खऱ्या अर्थाने उत्तम प्रकारचे झाल्याची खात्री पटते. नाट्यगृहात आतमध्ये आल्यानंतर शहरातील नाट्यगृहात आल्यासारखे वाटते. रामदासभाईंचा वाढदिवस आणि नाट्यगृहाचे लोकार्पण हा दुग्धशर्करा योग आहे. वाढदिवसानिमित्त रामदासभाईंच्या माध्यमातून जनतेला दिलेले हे गिफ्ट आहे असे बोललो, तर वावगे ठरणार नाही." या नाट्यगृहाला दिलेले माँसाहेबांचे नाव ही त्यांना श्रद्धांजली असल्याचेही त्यांनी नमूद केले. रामदासभाईंच्या संकल्पनेतून उभे राहिलेले हे नाट्यगृह मुंबईसारख्या शहरातील नाट्यगृहालाही लाजवेल असे आहे, याबद्दल त्यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांचे अभिनंदन केले. "आपण ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे काम करत असतो. या नाट्यगृहात ३ दिवस नाट्यप्रेमींसाठी मेजवानी आहे," असेही शिंदे म्हणाले.

'नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन' विकासाचे सूत्र

आपण 'नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन' असे काम करतो, ज्यामुळे विकासाच्या प्रकल्पांबाबत तात्काळ सह्या करून निधी वर्ग होतो. अडीच वर्षांत जे काम केले ते आपल्यासमोर आहे, ज्यामुळे अशी नाट्यगृहे उभी राहिली, रस्ते, पाणी यांसारख्या अनेक सुविधा मिळाल्या. माणसाच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून मनोरंजनाची गरज असते, त्यामुळे नाट्यगृहांना खूप महत्त्व आहे. दापोलीतील नाट्यगृहासाठी १५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सिंधुरत्न योजना आणि कोकण विकासाचे ध्येय

श्री. शिंदे यांनी पुन्हा आपला अजेंडा स्पष्ट करत सांगितले की, सिंधुरत्न योजना सुरू करण्याबाबत ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील. अडीच वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटी रुपये लोकांचे जीव वाचवण्यासाठी दिले आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न सुरू असून, राज्याला पुढे नेणे आणि कोकणचा विकास करणे हे आपले ध्येय आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी सरकार काम करत आहे. मुंबई-सिंधुदुर्ग एक्सेस कंट्रोल रोड आणि मुंबई-गोवा सागरी महामार्ग याचे काम सुरू आहे, तर कोकणातील ९ खाड्यांवर पूल बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून, ती अधिक मजबूत केली जात आहे. काजू बोर्ड स्थापन केले असून, एमआयडीसीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प कोकणात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक चळवळीला बळ - डॉ. उदय सामंत

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रामदासभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, जिल्ह्यात तीन नाट्यगृहे आहेत आणि श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहासाठी १५ कोटी, चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी १५ कोटी आणि खेड येथील नाट्यगृहासाठी १३ कोटी मिळाल्याने जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळ टिकून राहिली, हे गर्वाने सांगितले पाहिजे. राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांच्या मागणीनुसार या नाट्यगृहाच्या सोलर पॅनेलसाठी ८० लाखांचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले यांनीही रामदास कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अद्ययावत नाट्यगृहाबद्दल योगेश कदम यांचे कौतुक केले. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी १५ वर्षांपासून बंद असलेल्या नाट्यगृहाच्या कामासाठी १३ कोटीचा निधी दिल्याबद्दल श्री. शिंदे यांचे आभार मानले. येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून ४८ कोटींची नळपाणी योजना मंजूर झाल्याचे आणि त्याचे काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Eknath Shinde, Khed Cultural Center, Ratnagiri, Ramdas Kadam Birthday, Konkan Development, Maharashtra Government, Political Event, Infrastructure Project

 #EknathShinde #KonkanDevelopment #Ratnagiri #Khed #MaharashtraGovernment #RamdasKadam #CulturalCenter #Infrastructure #SindhuratnaYojana #MaharashtraPolitics

"राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय" : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे "राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय" : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Reviewed by ANN news network on ७/२७/२०२५ ०८:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".