मिरकरवाडा बंदर विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन

 


मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास : नितेश राणे 

आणखी ३६ कोटींचा प्रस्ताव तयार : उदय सामंत

रत्नागिरी, २७ जुलै  : "मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमणासारख्या कठोर निर्णयांचीही भीती बाळगली नाही. आता या बंदराच्या आणि पर्यायाने इथल्या मच्छिमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामे केली जातील," असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर, मिरकरवाडा बंदर विकासासाठी आणखी ३६ कोटींचा प्रस्ताव तयार असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

आज मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मत्स्य विकास आयुक्त किशोर तावडे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

अतिक्रमणे हटवून विकासाचा मार्ग मोकळा

बंदरेमंत्री नितेश राणे म्हणाले, "आम्ही कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. त्यामध्ये मिरकरवाडा बंदराचा विकास आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, इथे अतिक्रमणाच्या अडचणी समोर आल्या. काहींनी आमच्याबद्दल तीव्र गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ठाम राहिलो आणि त्यामुळेच आजचा दिवस उजाडला आहे." प्रत्येक नागरिकाचे भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुसऱ्या टप्प्यात विविध विकासकामांचा समावेश असून, बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साठवण क्षमता, बर्फ कारखाने, सांडपाणी व्यवस्था, मासेमारीची यंत्रणा आणि इतर सोयीसुविधा यांचा त्यात समावेश आहे. इथले अतिक्रमण हटवताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केलेल्या सहकार्याचा राणे यांनी आवर्जून उल्लेख केला. या विकास प्रक्रियेकडे त्यांचे लक्ष असून लवकरच तिसऱ्या टप्प्यातील विकासासाठी सज्ज राहणार असल्याचेही ते म्हणाले. "आजचा हा विकासदृष्टीकोन मच्छीमार समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे," असेही त्यांनी सांगितले.

मिरकरवाड्याचा विकास हा कोकणच्या सुपुत्रांमुळेच शक्य

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, "मिरकरवाड्याचा विकास व्हावा, यासाठी गेली वीस वर्षे झगडतोय. पण, तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावं लागलं." या बंदराच्या विकासासाठी २२ कोटींचा पहिला टप्पा सुरू असून, ३६ कोटींचा आराखडा विभागाने तयार केला आहे. यातूनच इथल्या मच्छीमारांना समृद्धीची नवी दिशा मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी या बंदर विकासाचा संकल्प केला. त्यांच्यामुळेच आज मच्छीला कृषीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मिरकरवाडा भविष्यात राज्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे बंदर ठरेल, याचा मला विश्वास आहे. त्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. "अशावेळी अवैध मासेमारीला आळा घालतानाच आमचा छोटा मच्छीमारही मोठ्या मच्छीमारासारखाच जगला पाहिजे. हीच आमची भूमिका आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, "कोकणचा सुपुत्र मत्स्य व्यवसायासाठी जीव ओतून काम करतो, हे कोकणासाठी भाग्य आहे." नाटे आणि हरणे बंदरासाठी २०० कोटींचा निधी मंजूर झाला असून, भविष्यात मिरकरवाडा मलपीपेक्षा मोठे बंदर होईल यात दुमत नाही. त्यामुळेच माझ्या मतदारसंघात होणाऱ्या मत्स्य विकासासाठी, मच्छीमारांचे भवितव्य घडवण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल, असेही त्यांनी सांगितले.


Mirkarwada Port Development, Ratnagiri, Nitesh Rane, Uday Samant, Fisheries Development, Konkan Coast, Fishermen Empowerment, Infrastructure Project, Maharashtra Government

 #MirkarwadaPort #Ratnagiri #NiteshRane #UdaySamant #FisheriesDevelopment #Konkan #Maharashtra #Infrastructure #Fishermen #PortDevelopment

मिरकरवाडा बंदर विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन मिरकरवाडा बंदर विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन Reviewed by ANN news network on ७/२७/२०२५ ०८:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".