पुणे शहर : पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या एका टोळीला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरलेली नेक्सॉन गाडी आणि हंटर मोटारसायकल असा एकूण ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे हडपसर पोलीस ठाण्यातील २, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील १ आणि सिडको पोलीस स्टेशन (संभाजीनगर शहर) येथील १ असे एकूण ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक १४ जून २०२५ रोजी फिर्यादी यांनी आपले घर लॉक करून तुळजापूर-अक्कलकोट येथे गेले असता, अज्ञात इसमाने फिर्यादीच्या घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुरनं ५७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५, ३१७ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि (गुन्हे) निलेश जगदाळे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात वापरलेली नेक्सॉन गाडी आणि आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्यातील आरोपी चंदननगर, पुणे येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अतुल विजय भालेराव (वय ३०, रा. वांजळेमळा, देहू फाटा, देहूगाव, ता. हवेली, पुणे) याला ताब्यात घेतले.
अतुल भालेराव याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्याने, 'मी व माझा साथीदार प्रथमेश संतोष मकासरे (वय २०, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख, पुणे) यांनी मिळून हडपसर येथे घरफोडी केली आहे,' असे कबूल केले. अधिक चौकशीत त्यांनी प्रथमेश मकासरे याच्या घरी चोरीचा माल ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून २२ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरलेली टाटा नेक्सॉन गाडी (क्र. MH १४ JV ६९०४) आणि हंटर मोटारसायकल (क्र. MH १४ JE ३९९०) असा एकूण ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
आरोपी हे दिवसभरात नवीन सोसायटीमध्ये फिरून बंद घरांची माहिती काढत असत आणि रात्रीच्या वेळी अशा घरांचे कुलूप तोडून चोरी करत होते. तसेच, पोलिसांनी त्यांचा माग लागू नये यासाठी ते एका मार्गाने घरफोडी करून दुसऱ्या मार्गाने जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, सहा.निरीक्षक पवन यादव, उपनिरीक्षक मंगेश गायकवाड, प्रतिक सोंडे, अंमलदार सचिन जाधव, आशिष चव्हाण, गणेश कुंभार, सागर भोसले, समीर पांडुळे, प्रशांत बडाले, गणेश कांबळे, ओमकार कुंभार, संदीप दहिफळे, विशाल दुधाळ, प्रशांत फरांदे, अतुल बनकर यांनी केली.
Burglary, Arrest, Pune Police, Hadapsar, Theft, Gold Jewelry, Vehicle Recovery
#PunePolice #HadapsarCrime #BurglaryArrest #Theft #GoldRecovery #CrimeNews #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: