गुरुवार, ३१ जुलै, २०२५

'हिंदू दहशतवादा'च्या फेक नॅरेटिव्हला एनआयए न्यायालयाची चपराक: मालेगाव बॉम्बस्फोट निकालाचे केशव उपाध्ये यांनी केले स्वागत

 


मुंबई, ३१ जुलै २०२५: 'भगवा आतंकवाद' आणि 'हिंदू दहशतवाद' असा 'फेक नॅरेटिव्ह' (खोटा प्रचार) तयार करून हिंदू समाजाबद्दल विष पेरण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नास एनआयए न्यायालयाने दिलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाने सणसणीत चपराक बसली आहे, अशी भावना भारतीय जनता पार्टीचे (भाजप) प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी व्यक्त केली. या खटल्यात सात हिंदू राष्ट्रवाद्यांना आरोपी ठरवून अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याचा काँग्रेसचा कट उधळला गेला असून, हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाही, ही बाब या निकालातून स्पष्ट झाली आहे. या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करून न्यायालयाने न्यायाची बाजू भक्कम केली आहे, असे उपाध्ये म्हणाले.

काँग्रेसच्या 'हिंदू दहशतवाद' मोहिमेवर टीका

उपाध्ये यांनी म्हटले की, तब्बल १७ वर्षांपूर्वीच्या या घटनेत साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी व सुधाकर द्विवेदी यांना गुन्हेगार ठरवून काँग्रेस शासनाने त्यांचा अमानुष छळ केला. हिंदू दहशतवादाचा फेक नॅरेटिव्ह लोकांना पटावा याकरिता या आरोपींकडून गुन्हा कबूल करवून घेण्यासाठी अनन्वित अत्याचार केले. हिंदू समाजाला बदनाम करण्याचा व त्याद्वारे अल्पसंख्याक समाजाला कुरवाळून राजकीय लाभ उठविण्याचा हा व्यापक कट होता, हे आता सिद्ध झाले आहे, असेही श्री. उपाध्ये म्हणाले.

हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीर क्षमायाचना केली होती, तरीही काँग्रेसने हा शब्द रुजविण्यासाठी जंग जंग पछाडले. या मानसिकतेतूनच संसदेतील चर्चेत काँग्रेसी विचारांचा वारसा घेतलेल्या प्रणिती शिंदे यांनी 'ऑपरेशन सिंदूर' हा तमाशा असल्याचे उद्गार काढून पाक हल्लेखोरांनी हत्या केलेल्या निरपराधांचा व देशाच्या भावनांचा अपमान केला, तसेच पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासाठी राहुल गांधींसह सर्व काँग्रेसजनांनी केविलवाणी धडपड केली, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या इतिहासावर टीका

पंतप्रधान मोदी यांना आव्हान देत पाकिस्तान व चीनच्या भीतीचे भूत देशासमोर उभे करणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेसमुळेच पाकव्याप्त काश्मीर (PoK) निर्माण झाला, १९७१ च्या युद्धातील हजारो पाक युद्धबंदींना परत पाठवले गेले आणि त्यावेळी भारताने ताब्यात घेतलेला हजारो चौरस किलोमीटरचा भूभाग पाकिस्तानला बहाल केला गेला, असे उपाध्ये यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर पाकिस्तानला युद्ध थांबवण्यास भाग पाडावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना पत्र पाठवून गयावया केली होती. काँग्रेसने तेव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर पाकिस्तानी दहशतवादाचे भूत तेव्हाच गाडले गेले असते, असे श्री. उपाध्ये यांनी सांगितले.

भविष्यातील राजकारणाबद्दल इशारा

मालेगाव खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता हा काँग्रेसच्या हिंदूविरोधी व पाकधार्जिण्या राजकारणास मिळालेला धडा आहे. काँग्रेसने हिंदूद्वेषाचे राजकारण थांबवून अल्पसंख्याकांच्या भावना कुरवाळणे थांबवले नाही तर देशातील हिंदू समाज काँग्रेसला माफ करणार नाही, असा इशाराही श्री. उपाध्ये यांनी दिला. दहशतवादाला धर्म नसतो, पण जेव्हा जेव्हा देशात विध्वंसक दहशतवादी कारवाया घडल्या, तेव्हा त्यामागे पाकिस्तानातील मुस्लिम दहशतवाद्यांचा हात होता हे स्पष्ट झाले आहे, अशी पुस्तीही श्री. उपाध्ये यांनी जोडली.


Malegaon Blast Verdict, NIA Court, Hindu Nationalism, Fake Narrative, Congress Politics, BJP Maharashtra, Keshav Upadhye, Operation Sindoor, Pakistan Terrorism, Indian Army

#MalegaonVerdict #HinduTerrorism #FakeNarrative #CongressPolitics #BJP #NIACourt #OperationSindoor #IndianJustice #TerrorismHasNoReligion

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा