पिंपरी, १५ जुलै २०२५: मावळ तालुक्यातील शिवणे येथील मंडल अधिकारी मारुती महादेव चोरमले (५३) आणि त्याचा खासगी साथीदार जयेश बाळासाहेब बारमुख (३३) यांना दोन लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाईन रोडवर मंगळवारी (१५ जुलै) ही कारवाई करण्यात आली.
सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी मागितली लाच
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका ४६ वर्षीय तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराची बहीण आणि इतर २१ जणांनी २०१८-१९ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाकडून मावळ येथील ३८ गुंठे जमीन विकसन करारनामा करून घेतली होती. मात्र, त्याच बांधकाम व्यावसायिकाने ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने खरेदीखत झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी अर्ज करण्यात आला. तलाठ्याने नोंद करून ती मंजुरीसाठी मंडल अधिकारी मारुती चोरमले याच्याकडे पाठवली होती.
फेरफार रद्द करण्यासाठी पैसे मागितले
या प्रकरणात तक्रारदाराच्या बहिणीने आणि इतर २१ जणांनी हरकतीचा अर्ज दाखल केला होता. त्यावर मंडल अधिकारी चोरमले याने सुनावणी सुरू केली. दरम्यान, संबंधित फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ३८ गुंठे वादग्रस्त जमीन तक्रारदार आणि त्यांच्या २१ साथीदारांच्या नावावर करण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात चोरमले याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली.
रोख आणि ऑनलाईन पेमेंटद्वारे लाच स्वीकारली
लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी चोरमलेने तक्रारदाराला त्याचा खासगी साथीदार जयेश बारमुख याला भेटण्यास सांगितले. जयेश बारमुखने मंडल अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपये आणि स्वतःसाठी दहा हजार रुपये, अशी एकूण दोन लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. १५ जुलै रोजी एमआयडीसी भोसरी येथील स्पाईन रोडवर एका रुग्णालयासमोर आरोपींनी ही लाच स्वीकारली. चोरमलेने रोख दोन लाख रुपये घेतले, तर बारमुखने दहा हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले.
एसीबीने दोघांनाही केली अटक
लाच घेतानाच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ACB, Maval, Bribery, Mandal Adhikari, Corruption, Pune, Crime News, ACB Trap
#ACB #Bribery #Pune #Maval #Corruption #CrimeNews #Maharashtra #ACBTrap

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: