दिघोडे गावची 'सुवर्ण कन्या' अवनी कोळीची उत्तुंग भरारी; नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघात निवड
उरण, दि. ५ जुलै २०२५ : उरण तालुक्यातील दिघोडे गावची 'सुवर्ण कन्या' म्हणून ओळखली जाणारी अवनी अलंकार कोळी हिने नेमबाजी क्रीडा प्रकारात उत्तुंग भरारी घेतली आहे. कझागिस्थान येथे १४ ते २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणाऱ्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप २०२५ साठी डबल ट्रॅप शॉटगन ज्युनियर वूमन या प्रकारात तिची भारतीय संघात निवड झाली आहे. रायगड आणि नवी मुंबईतून भारतीय संघात निवड होणारी ती पहिली नेमबाज ठरली आहे, ही उरण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
पुरुषी मक्तेदारी मोडून काढणारी 'खेडेगावातील कन्या'
अवनी ही एका सामान्य घरातील मुलगी असून, तिने खेडेगावात मुलींच्या बाबतीत असलेल्या पारंपरिक विचारांना छेद दिला आहे. जिथे मुलींच्या हाती भांडी देण्याचा समज होता, तिथे तिच्या आई-वडिलांनी तिच्या हाती बंदूक दिली. बंदुकीची मक्तेदारी पुरुषांची असल्याचा ग्रामीण भागातील लोकांचा भ्रम तिने मोडून काढला. तिचे वडील अलंकार कोळी, जे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य आणि स्वतः राष्ट्रीय नेमबाज व उत्तम शूटिंग कोच आहेत, त्यांनी आपल्या कन्येला या क्षेत्रात प्रोत्साहन दिले. त्यांनी अवनीची हुशारी आणि जिद्द ओळखून तिला या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली, ज्यामुळे आज ती त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहे. तिची आई कविता गृहिणी असून, छोटा भाऊ अर्णव देखील बहिणीचाच आदर्श घेत आंतरशालेय जिल्हा स्पर्धा व मुंबई विभागीय स्पर्धा खेळला आहे.
प्रशिक्षण आणि दैदिप्यमान कामगिरी
अवनीने इंडियन मॉडेल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, उलवे येथे प्राथमिक शिक्षण घेतले आणि सध्या ती वीर वाजेकर कॉलेज, फुंडे, उरण येथे एफ.वाय. बी.एस्सी. मध्ये शिकत आहे. वयाच्या १२ व्या वर्षी तिने सिद्धांत रायफल आणि पिस्तूल शूटिंग क्लब, रायगड येथे राष्ट्रीय नेमबाज किशन खारके आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन, वरळी, मुंबई येथील सेक्रेटरी व कॉमनवेल्थ मेडलिस्ट श्रीमती शीला कानूगो यांच्या मार्गदर्शनाखाली पिस्तूल शूटिंगला सुरुवात केली. राज्यपातळीवर, झोनल, प्री-नॅशनल आणि नॅशनल शूटिंग स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी करत उरणमधील पहिली विख्यात नेमबाज होण्याचा सन्मान मिळवला. अनेकदा जखमी होऊनही तिने मेडल स्वीकारले असून, तिच्या जखमेतील रक्त अनेकदा तिच्या मेडल्सना लागल्याचे तिचे जंझावाती खेळ दाखवते.
सन २०२३ मध्ये छत्रपती स्टेडियम, बालेवाडी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रालस्टोन कोयलो यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील टीममधून डबल ट्रॅप शूटिंगचे शिक्षण घेऊन तिने अनेक मेडल्स मिळवले. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राच्या दोन टीममध्ये नेत्रदीपक कामगिरी करून तिने सांघिक महिला व कनिष्ठ महिला असे दोन राष्ट्रीय सुवर्णपदके पटकावली.
अवनीच्या या गगनभरारीबद्दल तिचे कुटुंबिय, शाळा, आणि समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिघोडे गावचे विद्यमान सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, मुसा मेहमूद काझी, साईम झुबेरखान देशमुख, अली रझा सय्यद आणि आय.एम.एस. उलवेच्या मुख्याध्यापिका गौरी शाह मॅडम यांचे तिच्या यशात मोलाचे योगदान आहे.
Avani Koli, Shooting Sports, Indian Team Selection, Asian Shooting Championship, Uran, Dighode Village, Women in Sports, Talent, Maharashtra Shooter
: #AvaniKoli #ShootingSports #IndianTeam #AsianChampionship #Uran #Dighode #WomenInSports #Maharashtra #Shooter

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: