गुरुवार, ३१ जुलै, २०२५

विकासाच्या वाटचालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे : नाना काटे

 

पुणे, दि. ३१ जुलै २०२५: विकासकामे करत असताना ज्येष्ठ नागरिक देत असलेल्या सूचना नेहमीच मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वार्षिक सभेत संवाद

पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते ज्येष्ठांशी संवाद साधत होते. गुरुवारी, ३१ जुलै रोजी गोविंद गार्डन हॉटेलच्या बांसुरी हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या वेळी नाना काटे यांच्या हस्ते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला नाना काटे यांच्यासह पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संचालक संजय भिसे, डॉ. कुंदाताई भिसे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जगन्नाथ काटे, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ आणि सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची रूपरेषा

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शोभा राजगुरे, निर्मला कासार आणि शकुंतला शिंदे यांनी स्वागतगीत सादर केले. असोसिएशनचे सचिव सखाराम ढाकणे यांनी अहवाल वाचन केले, तर खजिनदार सुभाष पाटील यांनी आर्थिक लेखाजोखा सादर केला. डॉ. सुभाष पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गीत-संगीत मैफलीत भारती न्यायाधीश आणि संतोष माहेश्वरी या कलावंतांनी बहारदार हिंदी-मराठी गाण्यांद्वारे उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. 'विसरू नको श्रीरामा मला', 'परदेसिया ये सच है पिया', 'जय जय शिवशंकर' या गाण्यांना ज्येष्ठ नागरिकांनी विशेष प्रतिसाद दिला. त्याआधी पद्मा गवळी आणि सहकाऱ्यांनी भजन सादर केले, त्यांना मृदंगावर प्रकाश दळवी आणि संवादिनीवर बाळकृष्ण चौधरी यांनी साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला शिंदे यांनी केले, तर आभार विवेकानंद लिगाडे यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी रमेश वाणी, अनिल कुलकर्णी, रमेश चांडगे, अशोक येळंमकर आणि अनिलकुमार शाह यांनी परिश्रम घेतले.


Nana Kate, Pimpri Chinchwad, Senior Citizens Association, Development Works, Public Guidance, Pimple Saudagar, Community Event, Social Harmony, Respect for Elders

 #NanaKate #PimpriChinchwad #SeniorCitizens #CommunityDevelopment #PimpleSaudagar #Guidance #SocialEvent #MaharashtraPolitics

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा