छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश; पंतप्रधान मोदींकडून 'मन की बात'मध्ये कौतुक
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणे ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जुलै रोजी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात केले. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पैठण तालुक्यातील पैठणी निर्मिती उद्योग चालवणाऱ्या कविता ढवळे यांच्या कामाचेही विशेष कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमात म्हणाले की, "आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशी बातमी युनेस्कोकडून आली आहे. युनेस्कोने मराठा साम्राज्याच्या १२ किल्ल्यांना 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून मान्यता दिली आहे. या प्रत्येक किल्ल्याच्या इतिहासाचे एक-एक पान जोडले आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे."
पंतप्रधानांनी यावेळी काही प्रमुख किल्ल्यांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, साल्हेरच्या किल्ल्यामध्ये मुघलांचा पराभव झाला होता. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही किल्ले असे आहेत की, त्यांना जिंकणे शत्रूला शक्य झाले नाही. खांदेरीचा किल्ला तर समुद्रामध्ये बनवण्यात आलेला अद्भुत किल्ला आहे. हा किल्ला तयार होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्याचे अनेक प्रयत्न शत्रूंकडून झाले; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रतापगडच्या किल्ल्यामध्ये अफजल खानाला पाणी पाजले होते, तर विजयदुर्ग या किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे होते. छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते, याचे प्रमाण या किल्ल्यांमध्ये सापडते, असेही मोदी म्हणाले. काही वर्षांपूर्वी आपण रायगडावर गेलो असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन वंदन केले होते. त्यावेळी आलेला अनुभव आयुष्यभरासाठी आपल्या मनात कोरला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कविता ढवळे यांच्या कार्याचे पंतप्रधानांकडून कौतुक
याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील कविता ढवळे यांच्या कार्याची प्रशंसा केली. कविता ढवळे यांनी सुरुवातीला एका लहानशा खोलीमध्ये पैठणी निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे जागा किंवा इतर सुविधा नव्हत्या. परंतु, सरकारकडून मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्या कलेला भरारी घेण्याचे बळ मिळाले. आता त्या या व्यवसायातून तिप्पट कमाई करतात आणि त्या स्वतः पैठणी विणतात व त्यांची विक्री करतात, अशा शब्दांत श्री. मोदी यांनी कविता ढवळे यांचे कौतुक केले.
मुंबईत 'अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स ऑलिंपियाड'चे आयोजन
पुढील महिन्यात मुंबईमध्ये 'ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स ऑलिंपियाड' चे आयोजन केले जात आहे. यामध्ये ६० पेक्षा जास्त देशांतील विद्यार्थी सहभागी होतील. शास्त्रज्ञही यावेळी उपस्थित राहतील. आत्तापर्यंत झालेल्या ऑलिंपियाडमध्ये हे सर्वात मोठे आणि भव्य ऑलिंपियाड होईल, असेही श्री. मोदी यांनी नमूद केले.
Chhatrapati Shivaji Maharaj Forts, UNESCO World Heritage, Man Ki Baat, Prime Minister Narendra Modi, Kavita Dhawale Paithani, Paithan, Astronomy and Astrophysics Olympiad Mumbai, Maharashtra Pride
#ShivajiMaharaj #UNESCO #WorldHeritage #MannKiBaat #NarendraModi #MaharashtraPride #Paithani #KavitaDhawale #AstronomyOlympiad #IndianHeritage

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: