पुणे, दि. ४ जुलै २०२५: पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महत्त्वाच्या महामार्गांच्या रुंदीकरणाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSRDC) या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. या कामांना राज्याचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने विशेष प्राधान्य दिले असून, दोन स्वतंत्र भागांमध्ये ही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
निविदांचा तपशील: हडपसर-यवत सहापदरी महामार्गासाठी ३,१४६.८५ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतूक प्रवाहाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, तळेगाव-चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत चारपदरी आणि पुढे सहापदरी रस्त्यासाठी ३,१२३.९२ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
वाहतूक समस्येवर दिलासा तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि यवत हे परिसर औद्योगिक आणि निवासी दृष्टिकोनातून झपाट्याने विकसित होत आहेत. वाढत्या वाहन संख्येमुळे या भागात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रे, वसाहती, आयटी हब आणि नागरी वस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढून वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कामाला सुरुवात व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. या विकासकामांमुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळणार असून, दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. पुणे, रायगड, अहमदनगर (अहिल्यानगर), नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यांतील नागरिकांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
Local News, Infrastructure, Road Development, Pune, Maharashtra Government
#PuneInfrastructure #RoadWidening #MSRDC #HadapsarYavat #TalegaonChakan #TrafficSolution

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: