‘गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा!’ - हिंदू जनजागृती समितीचे सुनील कदम यांचे आवाहन
उरण, दि. ११ जुलै २०२५: सनातन संस्थेच्या वतीने यंदा देशभरातील ७७ ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात पनवेल आणि उरण येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवांमध्ये धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देण्याचे आणि धर्माच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन विविध वक्त्यांनी केले.
'गुरुपूजन म्हणजे राष्ट्र आणि धर्मासाठी कार्य करणे':
पनवेल येथील श्री बँक्वेट्स येथे १० जुलै रोजी संपन्न झालेल्या महोत्सवात हिंदू जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी 'राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या अधिक असूनही, अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे.
महोत्सवातील इतर महत्त्वाचे मुद्दे:
महोत्सवाचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा'च्या प्रेरणादायी व्हिडिओचे प्रक्षेपण करण्यात आले, तसेच रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजप करण्यात आला. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
वक्त्यांचे मनोगत:
पनवेल येथील महोत्सवात भाजपचे प्रदेश संयोजक धनराज विसपुते म्हणाले, "विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केवळ भौतिक ज्ञान न देता नीती, संस्कार, साधना, नामजप आणि मूल्य आधारित आध्यात्मिक ज्ञान मिळणे आताच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. या आचरणानेच केवळ आपले नव्हे, तर राष्ट्र आणि धर्माचे रक्षण होणार असून हे करणे आपलेच दायित्व आहे."
उरण येथील महोत्सवात अधिवक्ता वृषाली पाटील म्हणाल्या, "भारत देशात बहुसंख्य हिंदू असूनसुद्धा भारत हिंदुराष्ट्र का नाही? याचा विचार करून प्रत्येकाने धर्माचरण करणे आवश्यक आहे. हिंदूंनी आता स्वतःच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. धर्माचरण, साधना, नैतिकता आणि स्वधर्म जपण्यावर भर देत समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रासाठी आध्यात्मिक आणि व्यावहारिक जबाबदारी स्वीकारावी." यावेळी सनातन संस्थेच्या प्रविणा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
देश-विदेशांतील हजारो भाविकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, ज्याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: