विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहाकडून निरोप; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी केले कौतुक
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांचा कार्यकाळ येत्या ऑगस्टमध्ये संपणार असून, काल सभागृहाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव केला.
बसचालकाच्या मुलापासून विरोधी पक्षनेतेपदापर्यंतचा प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेताना, एका बसचालकाच्या मुलापासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदापर्यंतचा त्यांचा प्रवास विशेषत्वाने अधोरेखित केला. जनतेचे प्रश्न ठळकपणे मांडण्यासाठी त्यांनी केलेल्या अभिनव आंदोलनांची फडणवीस यांनी प्रशंसा केली. वंदे मातरम संदर्भातले आंदोलन आणि औरंगाबाद नामांतराच्या संघर्षातील दानवे यांच्या योगदानाचाही मुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
स्पष्टवक्तेपणा आणि पद जिवंत ठेवले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दानवे यांच्या स्पष्टवक्तेपणाकडे आणि थेट संवाद साधण्याच्या हातोटीकडे लक्ष वेधले. सभागृहाचे सदस्य असताना आणि विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांनी शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या अडचणींना वाचा फोडली, असे पवार म्हणाले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी केवळ निभावली नाही, तर ते पद जिवंत ठेवले, असे गौरवोद्गार काढले. दानवे यांच्या कारकिर्दीतील हा पूर्णविराम नसून, स्वल्पविराम ठरावा, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
उत्तम आणि यशस्वी विरोधी पक्षनेते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव विधानपरिषदेचे एक उत्तम आणि यशस्वी विरोधी पक्षनेते म्हणून घेतले जाईल, असे प्रतिपादन केले. विरोधी पक्षनेता आक्रमक असावा, पण आक्रस्ताळी नसावा, तसे दानवे आहेत, असेही ते म्हणाले. भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी दानवे यांची कारकीर्द कायम महाराष्ट्राच्या लक्षात राहील अशी ग्वाही दिली.
सर्वसमावेशक आणि लढवय्या व्यक्तिमत्व
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दानवे हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि विचार कृतीत उतरवणारे विरोधी पक्षनेते होते, असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सामान्य कुटुंबातून येऊन चळवळीतून उभा राहिलेला आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करून विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मजल मारल्याबद्दल दानवे यांचे आभार मानले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी दानवे हे कट्टर, लढवय्या शिवसैनिक असून, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम केलं असे कौतुक केले. दानवे यांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून यशस्वी विरोधी पक्षनेता म्हणून कारकीर्द गाजवली, असेही परब म्हणाले. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दानवे यांच्या तडफदार आणि तात्त्विक मांडणीचे कौतुक केले.
Ambadas Danve, Leader of Opposition, Maharashtra Legislative Council, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray), Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Maharashtra Politics
#AmbadasDanve #MaharashtraPolitics #LegislativeCouncil #ShivSena #DevendraFadnavis #Farewell #LeaderOfOpposition #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: