११ ऑगस्टपासून जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण; २४०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

 


उरण, दि. १८ जुलै २०२५ : उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील (JNPT Vidyalaya), शेवा येथील १०१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ११ ऑगस्ट २०२५ पासून रुस्तमजी फाउंडेशनच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभारा विरोधात आमरण उपोषण करणार आहेत. संस्थेकडून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न करणे, तसेच गेल्या सात वर्षांपासून वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता (DA) न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

सात वर्षांची थकबाकी आणि वेतन आयोगाचा प्रश्न

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाचा कार्यभार नव्याने स्वीकारणाऱ्या रुस्तमजी फाउंडेशन या संस्थेने कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना आजतागायत सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. इतकेच नव्हे, तर सहाव्या वेतन आयोगानुसार सुरू असलेल्या वेतनामध्ये जुलै २०१९ पासूनची वार्षिक वेतनवाढ आणि राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता गेली सात वर्षे दिलेला नाही. त्यामुळे रुस्तमजी फाउंडेशनने शिक्षकांवर फार मोठा अन्याय चालविला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आंदोलनाची भूमिका आणि प्रशासनाला इशारा

या सात वर्षांची थकीत रक्कम फरकासह सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्यास दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पासून जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय - शेवा येथील माध्यमिक इमारतीच्या गेटसमोर सर्व शालेय कर्मचारी शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करणार आहेत. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र राज्याची असेल, असा इशारा शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, ज.ने.पो.वि. शेवा, ता. उरण, जिल्हा- रायगड यांनी प्रशासनाला दिला आहे.

कर्मचाऱ्यांची ढासळलेली मानसिकता आणि आर्थिक कुचंबणा

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रुस्तमजी केरावाला फाउंडेशनच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. विविध प्रलंबित समस्या व मागण्या संदर्भात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये निवेदन देऊन विनंती केली होती, परंतु आजतागायत एकही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिकता ढासळली आहे आणि आर्थिक कुचंबणा करण्याचे काम या संस्थेने चालू ठेवले आहे. वारंवार शालेय समितीमध्ये शिक्षक प्रतिनिधींनी विविध समस्या आणि मागण्यांचे विषय काढले असतानाही संस्थेच्या प्रशासनाने डोळेझाक केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

२४०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

जेएनपीए अंतर्गत सुरू असलेल्या या विद्यालयात १०१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत असून, केजी ते १० पर्यंतची इंग्रजी आणि मराठी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत २४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या समस्येवर लवकर तोडगा न निघाल्यास २४०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार असल्याने पालक वर्गांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.


Uran, Raigad, Jawaharlal Nehru Port Vidyalaya, Sheva, Rustamji Foundation, Teachers Strike, Non-Teaching Staff, Indefinite Hunger Strike, Pay Commission, Dearness Allowance, Student Future, Education Protest

#Uran #TeachersStrike #JNPTA #RustamjiFoundation #HungerStrike #EducationProtest #Raigad #StudentsFuture #PayCommission #Maharashtra

११ ऑगस्टपासून जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण; २४०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ११ ऑगस्टपासून जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण; २४०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात Reviewed by ANN news network on ७/१८/२०२५ १२:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".