१६ व्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक नियुक्ती पत्र प्रदान
'सरकारी नोकरीत उत्तम काम करून देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी योगदान द्या' - केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे आवाहन
पुणे, ११ जुलै २०२५: देशाचे भविष्य तरुणांच्या हातात असून, ज्या तरुण-तरुणींना केंद्र सरकारच्या सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. सरकारी नोकरीत उत्तम काम करून देशाला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी तरुण पिढीने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज तरुणांना केले.
देशभरात आज १६ व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ४७ ठिकाणांहून या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. पुण्यात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि रेल्वेचे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
नियुक्ती पत्रांचे वितरण: केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात २५ जणांना केंद्र सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. देशभरात एकूण ५१ हजार नियुक्ती पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वितरित करण्यात आली. पुणे येथे २०० जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. टपाल खाते, रेल्वे, सीआयएसएफ (CISF), बँकांसह विविध केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये सेवेसाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक नियुक्तीपत्रे रेल्वे खात्यात (४१ हजार) देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने तरुण पिढीला यावेळी संबोधित केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: