पुणे जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' घोषित, बैलगाडा शर्यती व जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध
पुणे, २५ जुलै २०२५: पुणे जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचे (Lumpy Skin Disease) नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांच्याकडील अहवालानुसार, जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांमधील (म्हैस वर्गातील प्राणी वगळून) पाठविलेले रोग नमुने लम्पी चर्मरोगासाठी 'होकारार्थी' (पॉझिटिव्ह) आले आहेत. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका हद्दीतील गुरे आणि गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी (म्हैस वर्गीय वगळून) जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी, पुणे महानगरपालिका हद्दीतील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था आणि दुग्ध व्यावसायिक या सर्व संबंधितांना लम्पी चर्मरोगाबाबत नियंत्रण व उपाययोजना करणे संबंधी आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी सूचना केल्या आहेत. यासाठी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महापालिकेच्या आरोग्य अधिकारयांनी म्हटले आहे की,
पुणे जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' घोषित
पुणे जिल्हयात लम्पी चर्मरोग या संसर्गजन्य रोगाचा गोवर्गीय जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेला असून, दैनंदिन अहवालानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये रोगाची संसर्गकेंद्रे (Epicentre) निदर्शनास आली आहेत. या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 'प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९' (Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009) मधील तरतुदीनुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांनी संपूर्ण पुणे जिल्हा गोवर्गीय जनावरांमधील लम्पी चर्मरोगासाठी "नियंत्रित क्षेत्र" म्हणून घोषित केले असून, खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत:
जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध: लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करता यावे यासाठी, गुरे आणि गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी (म्हैस वर्गीय वगळून) ज्या ठिकाणी पाळले जातात, त्या ठिकाणापासून उक्त नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण व वाहतूक करताना किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण (Goat Pox Vaccination) केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
संक्रमित प्राण्यांची ने-आण वर्जित: कोणत्याही व्यक्तीस, बाधीत गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही बाधीत झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांपासूनचे अन्य कोणतेही उत्पादन उक्त नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
बाजार आणि खरेदी-विक्रीवर नियमन: कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे व बाजारातील खरेदी-विक्री करताना किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील.
शर्यती, जत्रा, प्रदर्शनांवर निर्बंध: गोवर्गीय प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे इत्यादी प्रसंगी सहभागी होणाऱ्या सर्व गोवर्गीय प्रजातीच्या जनावरांचे किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील.
रिंग व्हॅक्सीनेशन: प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागातील पशुपालकांच्या गोजातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येतील, अशा ठिकाणापासून ५ कि.मी. त्रिज्येच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेल्या जनावरांचे 'रिंग व्हॅक्सीनेशन' (Ring Vaccination) त्वरित करून रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे अनिवार्य आहे.
कीटक नियंत्रण कार्यक्रम: लम्पी चर्मरोगाचा फैलाव इतरत्र होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या अॅडव्हायजरीनुसार बाह्य कीटक नियंत्रण कार्यक्रम (Vector Control Programme) जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये (नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात) राबविण्यात यावा.
पुणे महानगरपालिका हद्दीतील गुरे आणि गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी (म्हैस वर्गीय वगळून) जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी, पुणे महानगरपालिका हद्दीतील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था आणि दुग्ध व्यावसायिक या सर्व संबंधितांना सदर परिपत्रकाद्वारे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये लम्पी चर्मरोगाबाबत नियंत्रण व उपाययोजना करणे संबंधी सूचित करण्यात येत आहे, असे आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
Lumpy Skin Disease, Pune District, Animal Health, Disease Control, Cattle Transportation Ban, Ring Vaccination, Maharashtra Government
#LumpySkinDisease #PuneNews #CattleHealth #DiseaseOutbreak #AnimalVaccination #MaharashtraNews #DistrictAdministration #RingVaccination #CattleTransportation #PuneDistrict

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: