उरण : शहरी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांवर शिवसेना आक्रमक; महावितरणला ३० जुलैपर्यंतची मुदत

 


शिवसेनेतर्फे अधिकाऱ्यांची भेट, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा; ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफीची मागणी

'३०० युनिट पर्यंत सर्वांना बिल माफ करण्यात यावे', 'वेळेत काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा'

उरण, ११ जुलै २०२५: उरण शहर आणि ग्रामीण भागांत वारंवार जाणारा वीजपुरवठा खंडित होणे, तुटलेले व मोडकळीस आलेले खांबे, लोंबकळत असलेल्या तारा, विजेचा कमी दाबाचा प्रवाह, कर्मचाऱ्यांची अरेरावी, विनापरवानगी वीज मीटर बसवणे, भरमसाट बिले, तसेच ग्राहकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यासारख्या विविध प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. जनतेच्या आणि गोरगरिबांच्या समस्या त्वरित सुटाव्यात, तसेच ३०० युनिटपर्यंत सर्वांना वीज बिल माफ करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालय, कोटनाका येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन जाब विचारला.

माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीखाली या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयाला भेट दिली. यावेळी रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका संपर्क प्रमुख दिपक भोईर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सरपंच भास्कर मोकल, तालुका संघटक बी. एन. डाकी, गटनेते गणेश शिंदे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महावितरण अभियंत्यांचे आश्वासन व शिवसेनेची भूमिका: 

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व सरपंचांनी विविध समस्या मांडत, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास विष्णू गायकवाड यांना उरण शहर व ग्रामीण भागातील समस्या का सुटत नाहीत याबाबत जाब विचारण्यात आला. त्यावर माहिती देताना अभियंता गायकवाड यांनी सांगितले की, "माझी नुकतीच पंधरा दिवसांपूर्वी उरण महावितरण कंपनी येथे नियुक्ती झाली आहे. मी येथे नवीन आहे. मी समस्या समजून घेतो व त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. अगोदरची रखडलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. प्रत्येक ग्रामपंचायतला तसेच सरपंच यांना भेट देऊन त्या-त्या गावातील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. ग्राहकांना जनतेला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ तसेच आम्हाला काही वेळ द्या. ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू."

गायकवाड यांनी सर्व समस्या सोडविण्यासाठी २० दिवसांचा अवधी देण्याची विनंती शिवसेनेच्या शिष्ट मंडळाकडे केली. यावर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीला २० दिवसांची मुदत दिली आहे, त्यानुसार ३० जुलैपर्यंत सर्व कामे करण्याची वेळ महावितरणला देण्यात आली आहे. या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने माजी आमदार मनोहर भोईर, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, बी. एन. डाकी, भास्कर मोकल, रोहिदास पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महावितरण वीज कंपनीला दिला आहे.


उरण : शहरी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांवर शिवसेना आक्रमक; महावितरणला ३० जुलैपर्यंतची मुदत उरण : शहरी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांवर शिवसेना आक्रमक; महावितरणला ३० जुलैपर्यंतची मुदत Reviewed by ANN news network on ७/११/२०२५ ०६:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".