मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्र्यांचा परिचय; ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) मुंबईत उत्साहात प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा परिचय करून दिला. यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले.
राज्याच्या आर्थिक स्थितीशी संबंधित महत्त्वाचा निर्णय म्हणून, अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहासमोर ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. दोन्ही सभागृहांनी यापूर्वी संमत केलेल्या विविध विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनी अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची तालिका सदस्य म्हणून नियुक्ती केली. यानंतर संबंधित मंत्र्यांनी अनेक शासकीय विधेयकं सभागृहासमोर सादर केली.
दिवसाच्या अखेरीस, माजी आमदार रोहिदास देशमुख, विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम आणि समाजसेविका डॉ. श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. सभागृहातील सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून या शोकप्रस्तावाला संमती दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
Maharashtra Legislature, Monsoon Session, Mumbai, State Politics, Government Business
#MaharashtraAssembly #MonsoonSession #Mumbai #VidhanMandal #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #AjitPawar #LegislativeSession

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: