पुरी, ओडिशा: जगभरातील हजारो भक्तांच्या उपस्थितीत आज, शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी ओदिशामधील पुरी शहरात प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहाडी बिजे या विधीने देवतांची श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या संबंधित रथांपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
वेळापत्रकानुसार, आज दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान गजपती राजा दिव्यसिंहदेव यांच्या हस्ते या तीन रथांवर 'चेहरा पहानरा' विधी आणि शासकीय स्वच्छता विधी पार पडले. त्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता सध्याच्या अनंत रोडवर रथ ओढण्यास सुरुवात झाली आहे.
ही भव्य यात्रा पुरीतील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन गुंडीचा मंदिरापर्यंत जाते. अशी मान्यता आहे की, भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासोबत त्यांच्या मावशीच्या घरी, गुंडीचा मंदिरात जातात. ही रथयात्रा एकूण १२ दिवस चालणार असून ५ जुलै रोजी 'बहुडा यात्रा' (परतीची यात्रा) होईल आणि ८ जुलैला नीलाद्री विजयाने या यात्रेचा समारोप होईल, त्यावेळी भगवान जगन्नाथ त्यांच्या मूळ मंदिरात परत येतील. ही रथयात्रा ही १२ दिवसांची असली तरी, त्याची तयारी काही महिने आधीच सुरू होते. या रथयात्रेदरम्यान अनेक धार्मिक विधी, अनुष्ठाने आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या शुभेच्छा
पवित्र रथयात्रेनिमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत आणि परदेशात राहणाऱ्या महाप्रभू जगन्नाथांच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. "रथावर बसलेले बडे ठाकूर बलभद्र, महाप्रभू श्री जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि चक्रराज सुदर्शन यांचे दर्शन घेऊन लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळतो," असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. या शुभ प्रसंगी, संपूर्ण जगात शांती, मैत्री आणि स्नेहाचे वातावरण राहावे अशी प्रार्थना महाप्रभू श्री जगन्नाथांकडे राष्ट्रपतींनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जगन्नाथ यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
अहमदाबादमध्येही रथयात्रेला प्रारंभ
दरम्यान, या निमित्त गुजरातमध्ये देखील रथयात्रा निघाली आहे. अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जमालपूर मंदिरात मंगला आरती करून या रथयात्रेचा प्रारंभ केला. अहमदाबादची रथयात्रा पुरीच्या यात्रेनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी रथयात्रा मानली जाते, जिथे लाखो भाविक सहभागी होतात.
Jagannath Rath Yatra, Puri, Odisha, Ahmedabad, Lord Jagannath, Rath Yatra 2025, Hindu Festival, Devotion, President Droupadi Murmu, PM Narendra Modi, Amit Shah
#RathYatra #JagannathPuri #Odisha #Ahmedabad #LordJagannath #RathYatra2025 #HinduFestival #Devotion #Puri #JaiJagannath #PMNarendraModi #AmitShah
Reviewed by ANN news network
on
६/२७/२०२५ ०५:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: