जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनात जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असलेल्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथील साक्षी संतोष नाटेकर यांच्या अर्जावर बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी ही समस्या तत्काळ सोडवायला हवी होती. आजच श्रीमती नाटेकर यांना कार्यालयात बोलावून संबंधित अधिकाऱ्यांनी ही समस्या निकाली काढावी, असे निर्देश त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांना दिले.
इतर तक्रार अर्जांबाबत संबंधित अधिकारी आणि गटविकास अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील लोकशाही दिनापासून संबंधित तक्रार अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेऊन उपस्थित राहावे, असेही त्यांनी बजावले. तक्रार घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी जिल्हा स्तरावर येण्याची गरज भासू नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी आणि तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
====================================================
#Ratnagiri #DistrictCollector #LokshahiDin #GrievanceRedressal #LocalGovernance #MaharashtraGovernment
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२५ ०७:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: