'कॉफी विथ कमिशनर'मध्ये थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिलांचा सहभाग

 


पिंपरी, दि. २: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी चालवल्या जाणाऱ्या थेरगाव आणि भोसरी येथील शिलाई केंद्रातील महिलांनी आज 'कॉफी विथ कमिशनर' या उपक्रमात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी थेट संवाद साधला.

कोरोना महामारीत विधवा झालेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी थेरगाव येथे, तर महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने भोसरी येथे महापालिकेने शिलाई केंद्र सुरू केले आहे. या केंद्रांतील महिलांना आज आयुक्त शेखर सिंह यांच्याशी मनमोकळी चर्चा करण्याची संधी मिळाली. या वेळी उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाजविकास अधिकारी संतोषी चौरगे, समूह संघटक वैशाली खरात, जयश्री पवळे, भोसरी शिलाई केंद्रातील रुपाली जोशी, शितल दरंदले, चैतन्या सावंत, सुषमा कडदेकर, रसमिता भोई, राणी शेळके, जयश्री कांबळे, मानसी कांबळे, अमृता काळे, स्वप्ना आधारी, थेरगाव शिलाई केंद्रातील स्मिता अंकुशे, मंगल लोंढे, सीमा चौधरी, सविता शिंदे, सत्यभामा उदमले, मीना चौधरी आदी उपस्थित होत्या.

आयुक्त सिंह यांनी सुरुवातीला महिलांना भोसरी आणि थेरगाव येथील केंद्रांमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींविषयी माहिती घेतली. महिला सक्षमीकरणासाठी महापालिका करत असलेल्या विविध उपाययोजनांविषयी त्यांनी सांगितले. आगामी काळात थेरगाव आणि भोसरी येथील केंद्रांना नियमित काम मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये विविध संस्था आणि कंपन्यांचे गणवेश तयार करण्याच्या कामाचाही समावेश असेल आणि यासाठी आवश्यक प्रशिक्षण महिलांना दिले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. या वेळी 'नवी दिशा' उपक्रमांतर्गत भविष्यातील संधी, आव्हाने आणि अनुभवांबद्दल महिलांची आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.


"कोरोना महामारीनंतर रोजगार नसल्याने आम्ही निराश झालो होतो. पण महापालिकेच्या थेरगाव येथील प्रशिक्षण केंद्रामुळे आम्हाला खूप मोठा आधार मिळाला. आज आयुक्तांची भेट घेतल्यामुळे आम्हाला आमच्या प्रत्यक्ष समस्या, अभिप्राय आणि सूचना त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली. आमच्या सूचनांवर नक्कीच विचार केला जाईल, याची आम्हाला खात्री आहे." 

- मीना चौधरी, थेरगाव शिलाई केंद्र

"महापालिका प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे आम्हाला उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. आज आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेचे भविष्यातील नियोजन पाहून यापुढेही महापालिका आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील याची खात्री पटली आहे." 

- स्मिता अंकुशे, भोसरी शिलाई केंद्र

----------------------------------------------------------------------------------------------

#PimpriChinchwad #CoffeeWithCommissioner #WomenEmpowerment #SewingCenter #Theargaon #Bhosari #ShekharSingh #PMC #SocialInitiative

'कॉफी विथ कमिशनर'मध्ये थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिलांचा सहभाग 'कॉफी विथ कमिशनर'मध्ये थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिलांचा सहभाग Reviewed by ANN news network on ६/०२/२०२५ ०७:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".