पुणे: ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका ५० वर्षीय व्यक्तीला तब्बल साडेसात लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत धनकवडी येथे राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ७ लाख ५० हजार रुपये उकळले. ही घटना ५ मे ते ७ मे २०२५ दरम्यान ऑनलाइन माध्यमातून घडली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(डी) अंतर्गत मोबाईल धारक आणि संबंधित लिंक धारकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती चव्हाण करत आहेत. नागरिकांनी ऑनलाइन ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #OnlineFraud #TradingScam #CyberCrime #Sahakarnagar #PuneNews
ऑनलाइन नफ्याचे आमिष महागात, धनकवडीतील व्यक्तीला ७.५ लाखांचा गंडा
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२५ ०३:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: