रविवार, १ जून, २०२५

पुणे पोलिसांनी ४ सराईत गुन्हेगारांना केले तडीपार

 


पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी ४ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आणि त्यांच्यावरील गुन्हे:

  • नारायण रामदास स्वामी: वय ३८ वर्षे, रा. कोंढवा. यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि विनापरवाना दारू विक्री करणे यांसारखे ७ गुन्हे दाखल आहेत.

  • नेहाल विराज कुंभार: वय २८ वर्षे, रा. कोंढवा. यांच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे यासारखे ४ गुन्हे दाखल आहेत.

  • शुभम रमेश कवडे: वय ३० वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे. यांच्यावर गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे ठार मारणे, धमकावणे आणि बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यांसारखे ४ गुन्हे दाखल आहेत.

  • गणेश मेघनाथ भाट/तमायची: वय ३२ वर्षे, रा. घोरपडी, पुणे. यांच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करणे आणि शिवीगाळ करून धमकावणे यांसारखे ४ गुन्हे दाखल आहेत.

हे सर्व गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. आगामी सण/उत्सवांच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ ५ मध्ये पोलिसांचे गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष आहे. गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए आणि तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

जानेवारी २०२५ पासून परिमंडळ ५ कार्यालयाने १३ सराईत गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. प्रमाणे कारवाई केली आहे, ५ मोक्का कारवाईमध्ये ३७ गुन्हेगारांना अटक केली आहे आणि आतापर्यंत २१ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. अशाप्रकारे एकूण ७१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

तडीपार केलेले गुन्हेगार हद्दपारीच्या काळात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष ११२ किंवा जवळील पोलीस ठाणे अथवा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ कार्यालयाशी ०२०-२६८६१२१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#PunePolice #CrimeNews #Tadipar #Maharashtra #Pune #LawAndOrder #CriminalActivity

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा