पुणे: वाघोली पोलीस स्टेशनने एका अपहरण आणि खंडणी प्रकरणात चार सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. फिर्यादीच्या चुलत भावाने १५ जून २०२५ रोजी पोलिसांना खबर दिली होती की, "माझ्या चुलत भावाचे कोणीतरी अपहरण करून त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे १५ लाख रुपये द्या आणि त्यांना घेऊन जा" अशी धमकी दिली आहे. यानंतर, वाघोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तपास पथक तयार केले.
तपास पथकाने खबर देणाऱ्या व्यक्तीसोबत डमी पैशांची बॅग तयार केली आणि आरोपीने सांगितल्याप्रमाणे देहू रोड परिसरात सापळा रचला. पोलिसांनी डमी ड्रायव्हर म्हणून एका पोलीस अंमलदाराला डमी चारचाकी गाडीत डमी पैशांच्या बॅगसह उभे केले. दोन इसम दुचाकीवरून आले आणि पैशांची बॅग घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडण्यात आले. पाठलाग करून पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशी केली असता आरोपींनी आपली नावे गौरव राजू कांबळे (वय २९ वर्षे, रा. साईबाबानगर, गणपती मंदिराजवळ, चिंचवड रेल्वे स्टेशन, पुणे) आणि ऋषिकेश किशोर शिंदे (वय २४ वर्षे, रा. दुर्गानगर, निगडी तळवडे रोड, एस.आर.ए. बिल्डींग, फ्लॅट नं.८०४ निगडी पुणे) अशी सांगितली. त्यांनी मोहम्मद इरफान खान गुलफामखान (वय ३३ वर्षे, रा. रोड नं.१०, लेन नं.१, गवंडी बैंगणवाडी, नवी मुंबई) आणि मोहम्मद अतहर सोहेल मोहम्मद अनवर (वय २८ वर्षे, रा. मोहम्मद अली रोड, जकारीया इस्टेट, अल इब्राहम डोरमॅट्री, मुंबई) हे देखील या कटात सामील असल्याचे सांगितले. अपहरण केलेली व्यक्ती त्यांच्या दोन साथीदारांच्या ताब्यात असल्याचेही त्यांनी कबूल केले.
त्यानंतर गौरव कांबळे याच्या मोबाईलवरून अपहृत व्यक्ती ताब्यात असलेल्या आरोपींना फोन करून पैसे मिळाल्याचे खोटे कळविण्यात आले, ज्यामुळे त्यांनी अपहृत व्यक्तीला कासारवाडी मेट्रो स्टेशनच्या बाहेर सुखरूप सोडले. अपहृत व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन फिर्याद दिली की, १४ जून २०२५ रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून १६ जून २०२५ रोजी रात्री १:३० वाजेपर्यंत चार इसमांनी त्याला त्याच्या रूमवरून स्कॉर्पीओ गाडीतून पिंपरी चिंचवड भागात एका रूमवर घेऊन जाऊन मारहाण केली आणि मारण्याची धमकी दिली. अक्षयने घेतलेले २५ लाखांपैकी १५ लाख रुपये देण्याची खंडणी मागणी केली आणि त्याच्या चुलत भावाकडून १० लाख रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २७४/२०२५ भा.न्या.सं.क. ३०८, ३३३, १४० (२), १२७ (२), १८९ (१) (२), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी गौरव राजीव कांबळे , ऋषिकेश किशोर शिंदे , मोहम्मद इरफान खान गुलफामखान , आणि मोहम्मद अतहर सोहेल मोहम्मद अनवर हे आहेत.
ही कामगिरी अपर आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे आणि तपास पथकातील उप-निरीक्षक मनोज बागल , तसेच अंमलदार बाबासाहेब मोराळे, रामचंद्र पवार, प्रदीप मोटे , शिवाजी चव्हाण, समीर भोरडे, दीपक कोकरे , साईनाथ रोकडे , पांडुरंग माने , विशाल गायकवाड , मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी साळके, प्रीतम वाघ आणि नामदेव गडदडे यांनी केली.
Crime, Kidnapping, Extortion, Police Action
#PunePolice #WagholiPolice #Kidnapping #Extortion #CrimeNews #PimpriChinchwad
Reviewed by ANN news network
on
६/१८/२०२५ ०५:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: