रविवार, १ जून, २०२५

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ६ कोटींची फसवणूक करणारा आरोपी पनवेलमध्ये अटक

 


डिजिटल अटकेच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची  फसवणूक करणारा 

पुणे: पुणे सायबर पोलिसांनी डिजिटल अटकेच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल येथे सापळा रचून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला ९ नोव्हेंबर २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान एका अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. आरोपीने फिर्यादीला चौकशीच्या नावाखाली डिजिटल अटक करून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्यात एकूण ६ कोटी २९ लाख रुपये उकळले.

या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, आरोपीने फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळवल्याचे आणि त्यातील काही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवल्याचे पोलिसांना आढळले. हे बँक खाते श्री. धावीर कन्स्ट्रक्शन नावाचे असून ते रायगड जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती मिळाली.

सायबर पोलिसांनी आरोपी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला. आरोपी रायगड परिसरात मिळून न आल्याने पोलिसांनी त्याचा पनवेलमध्ये शोध घेतला आणि त्याला मोर्बे गावातील एका रिसॉर्टमधून अटक केली.

अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात आतापर्यंत आरोपींविरुद्ध विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय सायबर पोर्टलवर ५ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात आरोपीचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या कारवाईत पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर श्री. विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर श्री. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#CyberCrime #PunePolice #DigitalArrest #OnlineFraud #Maharashtra #SeniorCitizen #Fraud #CyberSecurity #Pune

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा