पुणे शहर: पुणे शहर स्वारगेट विभागातील पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिनांक १९ जून २०२५ रोजी स्वारगेट बस स्टँड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली, ज्यात सुमारे १६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार राहुल होळकर आणि विक्रम सावंत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, स्वारगेट बस स्टँड येथे एक सडपातळ इसम, दाढी राखलेला, मानेवर इंग्रजीमध्ये टॅटू काढलेला, डोक्यावर काळी टोपी आणि काळी पँट घातलेला आहे. तो स्वारगेट एस.टी. स्टँड येथून वेळापूर येथे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी उभा असून, त्याच्या हातात चॉकलेटी रंगाची बॅग असून त्या बॅगमध्ये गांजासारखा अंमली पदार्थ आहे.
या माहितीच्या आधारे, सदर इसमाला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचून स्वारगेट बस स्टँड येथे स्टाफ रवाना करण्यात आला. सदर इसमाला पंढरपूर बस स्टॉप येथे शोधून बॅगबाबत विचारणा करताच तो बॅग सोडून पळून जाऊ लागला. मात्र, पोलीस अंमलदार राहुल होळकर, नवनाथ शिंदे आणि स्वारगेट बस स्थानक ड्युटीवरचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. ग्रीन सिटीच्या पाठीमागे, वेळापूर, जिल्हा-सोलापूर) असे आहे. त्याच्या ताब्यातील चॉकलेटी रंगाची बॅग पंचासमक्ष तपासणी करता त्यात गांजासारखा अंमली पदार्थ मिळून आला. सदर इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आणखी ०२ साथीदार नामे अल्ताफ ईलाई तांबोळी (वय २८, रा. ग्रीनसिटीच्या पाठीमागे, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि विठ्ठल उर्फ दादा हरी शिवपाल (वय ३१, रा. आंबेडकरनगर, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्या मार्फतीने सदर माल विक्रीसाठी पुण्यात घेऊन आल्याचे तपासात सांगितले. सदर मालाचा उर्वरित साठा इनोव्हा क्रिस्टा गाडी नंबर-एम.एच.४५ए.डी.३३३३ या गाडीत साठा करून ठेवला असल्याची माहितीही त्याने दिली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकातीने पंढरपूर भागात जाऊन संशयित आरोपींच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन त्यांना पकडले.
सदर कारवाईमध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे: १. एकूण १,२१,०००/- (एक लाख एकवीस हजार रुपये) किमतीचा ६ किलो गांजा हा अंमली पदार्थ. २. एकूण १५,००,०००/- (पंधरा लाख रुपये) किमतीची गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली इनोव्हा क्रेस्टा गाडी (क्र. एम.एच.४५ए.डी.३३३३). ३. एकूण २५,०००/- रुपये किमतीचे आरोपींचे जप्त मोबाईल (एकूण ०३). असा एकूण १६,४६,०००/- (सोळा लाख सेहेचाळीस हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे, उप आयुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी कारवाईकामी नेमलेल्या विशेष पथकातील निरीक्षक, गुन्हे बंडगार्डन पो.स्टे संपतराव राऊत, उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे, अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, फिरोज शेख, सुजय पवार, नवनाथ शिंदे तसेच महिला पोलीस हवालदार प्रिती मोरे, सुजाता दांगट, राजेश गोसावी, विजय लोयरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली.
Drug Trafficking, Ganja Seizure, Swargate Police, Pune Crime, Organized Crime, Narcotics Bust.
#PunePolice #Swargate #DrugBust #Ganja #Narcotics #CrimeNews #OrganizedCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: