पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील एका प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २८, रा. सय्यदनगर हडपसर) हा सोलापूर जिल्ह्यात पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. पोलिसांवर गोळीबार करताना त्याला जवाबी कारवाईत ठार करण्यात आले. तो खंडणी प्रकरणातील आरोपी होता. त्याच्यावर पुणे शहरात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी यासह एकूण १५ गुन्हे दाखल होते.
मूळ प्रकरण काय?
गुन्हेगार टोळी प्रमुख रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याने हडपसर येथील १२९० चौरस फूट मिळकतीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मालकाच्या मिळकतीवरील शेड काढून स्वतःचा बोर्ड लावला आणि जागा परत मिळवण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
या प्रकरणी रिजवान पठाण आणि त्याच्या टोळीतील ७-८ सदस्यांवर काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि मोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ९ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर ८ आरोपी फरार होते.
एन्काऊंटरची संपूर्ण घटना
गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की शाहरुख सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे राजू अहमद शेख याच्या घरी लपून बसला आहे. सहायक निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथक त्याच्या अटकेसाठी पोहोचले.
पोलिसांनी आपली ओळख देऊन शाहरुखला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्याने गावठी पिस्तूल काढून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. "तुम मुझे पकडते क्या, आज तुम्हाराच खेल खतम करता" असे म्हणत त्याने पोलिसांना जीवे मारण्याचा धमकी दिली.
घरात महिला आणि मूल असल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा शरण येण्याचे आवाहन केले. परंतु तो गोळीबार करत राहिल्याने आत्मसंरक्षणार्थ सहायक निरीक्षक कांबळे यांनी जवाबी गोळीबार केला. शाहरुख जखमी होऊन खाली पडला आणि सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये मृत आरोपी शाहरुख आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime, Police Action, Encounter, Maharashtra, Pune, Criminal Gang, Extortion, MCOCA, Law Enforcement
#PuneCrimeBranch #PoliceEncounter #Maharashtra #OrganizedCrime #MCOCA #Extortion #LawEnforcement #Justice #CriminalGang #PuneNews #SolapurNews #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: