उरण, दि. २ : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दिव्यांगांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार मनोहर भोईर यांनी १ जून २०२५ रोजी २५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश देऊन मदतीचा हात पुढे केला. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी व्यवसायात मदत मिळावी, या उद्देशाने ते दरवर्षी दिव्यांगांना आर्थिक सहाय्य करतात.
आमदार असताना भोईर आपल्या आमदार निधीतून दिव्यांगांना मदत करत होते आणि आता माजी आमदार झाल्यावर मिळणाऱ्या पेन्शनमधूनही त्यांनी हे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे. दिव्यांग बांधवांप्रति त्यांची असलेली आपुलकी आणि प्रेम पाहून दिव्यांग स्वर्गीय महादेव रामदास पाटील (मामा) यांनी त्यांना 'दिव्यांग मित्र' ही उपाधी दिली होती.
या कार्यक्रमादरम्यान भोईर यांनी उरण तालुक्यातील नागरिकांना एकमेकांना मदत करण्याचे, गरीब व गरजूंची सेवा करण्याचे आणि एकजुटीने समस्या सोडवण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाचा आदर्श घेत 'आई फाउंडेशन'चे दिव्यांग संदेश राजगुरू आणि महेश पाटील यांनी १०० पेन शैक्षणिक साहित्य म्हणून वाटप केले. या कार्यक्रमामुळे इतरांनाही मदतीचा हात देण्याची प्रेरणा मिळाली.
भोईर यांच्या या कार्यक्रमाला दिव्यांग सामाजिक संस्था उरणच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. याच कार्यक्रमात उरण तालुक्यातील दिव्यांग मानसी विजय गावडे हिने बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवल्याबद्दल तिला 'दिव्यांग सामाजिक संस्था उरण'कडून शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले.
---------------------------------------------------------------------------------------------------
#Uran #ManoharShethBhoir #DisabilitySupport #SocialWork #FinancialAid #Inspiration #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: