मंगळवार, ३ जून, २०२५

पुणे: इंजिनीअरिंग परीक्षेत गैरप्रकार; प्राध्यापकासह चौघांना अटक


पुणे : पुणे शहरातील वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंजिनीअरिंगच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट ६ ने प्राध्यापकासह चार जणांना अटक केली आहे.    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक प्रतिक किसन सातव (वय ३७) आणि त्याचे साथीदार आदित्य यशवंत खिलारे (वय २०), अमोल अशोक नागरगोजे (वय १९) आणि अनिकेत शिवाजी रोडे (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी वाघोली परिसरातील रहिवासी आहेत.   

आरोपींनी संगनमत करून विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० हजार ते ५० हजार रुपये घेतले आणि परीक्षेत पास करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी कॉलेजमधील परीक्षा नियंत्रण कक्षाची बनावट चावी बनवून उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार केला. आरोपींनी गणित २ विषयाच्या उत्तरपत्रिकांचे सहा बंडल काढून विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिकांमध्ये बदल केला. या प्रकरणात एकूण २ लाख ६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.  

वाघोली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक २२६/२०२५ भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२), ३१८(२), ३१८(३), ३१८(४), ६१(२) तसेच सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) विधेयक २०२४ चे कलम ४, ५, १०, ११ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत गुन्हे शाखेच्या अधिकारी पंकज देशमुख, निखिल पिंगळे, गणेश इंगळे यांच्यासह युनिट ६ चे प्रभारी वाहिद पठाण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.


#PuneNews #EducationFraud #EngineeringCollege #AcademicScam #CrimeBranch #ExamMalpractice #PunePolice #EducationCrime #CollegeFraud #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा