लोटे परशुराम एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा: खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश
रत्नागिरी, दि. ३० जून : पावसाळ्याचा गैरफायदा घेऊन थेट नदीत प्रक्रिया न केलेले पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या लोटे परशुराम एमआयडीसीमधील कारखान्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज (सोमवारी) झालेल्या जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत त्यांनी ही मागणी केली. प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्यासह दिशा समितीचे सदस्य आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
विकासकामांचा सविस्तर आढावा आणि सूचना:
खासदार तटकरे यांनी बैठकीत प्रत्येक विषयाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आयोजित शिबिरांमध्ये दिशा समितीच्या सदस्यांना आमंत्रित करण्याची सूचना केली. तसेच, लाभार्थ्यांची तालुकानिहाय निवड कशी झाली, याची माहिती देण्यास सांगितले. 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरणने गतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
रेल्वे, खनिकर्म आणि जलजीवन मिशनवर लक्ष:
कोकण रेल्वेने जिल्ह्यातील रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी आणि भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे, असे तटकरे म्हणाले. खनिकर्म निधीचे ७ भागांमध्ये वाटप करावे. जलजीवन मिशनमधील पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या योजनांची तालुकानिहाय यादी तसेच काम करणाऱ्या ठेकेदारांची तपशीलवार माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम पूर्ण होऊनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, ती बाब गंभीर असून, याची पडताळणी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे त्यांनी बजावले.
गुहागर आणि कोकाकोला कंपनीच्या मुद्द्यांवरही चर्चा:
गुहागरमधील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबरोबरच स्ट्रीट लाईटचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना तटकरे यांनी केली. पाचपांढरी गावाला प्रांताधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि एमएमबीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करून समस्या सोडवाव्यात आणि त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांचा दर्जा चांगला असावा आणि ती वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण व्हावीत, यावर त्यांनी भर दिला.
कोकाकोला आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी:
कोकाकोला कंपनीच्या विरोधात मुकमोर्चा काढणाऱ्या ४०० लोकांवर दाखल केलेल्या गुन्हे प्रकरणी त्यांनी एसपींकडून तात्काळ अहवाल मागवला. "जर चुकीचे झाले असेल, तर हा विषय संपवावा. माझ्या मतदारसंघात अशी चुकीची कारवाई खपवून घेणार नाही," असे स्पष्टपणे सांगत, कोकाकोला कंपनीने स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी विषय वाचन केले. अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह सदस्य सतीश दिवेकर, सखाराम कदम, सुरेश सावंत, नेहा जाधव, संदीप बांदकर आदींसह विविध विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
Environmental Crime, Industrial Pollution, Ratnagiri, Maharashtra Politics, Infrastructure Development, Public Grievances, Water Contamination
#SunilTatkare #Ratnagiri #MIDC #EnvironmentalPollution #WaterPollution #Maharashtra #PublicSafety #Development #LoteParshuram #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: