पिंपरी-चिंचवड, १९ जून २०२५: जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात आज (१९ जून २०२५) मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनानंतर शहरात हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या तालात वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते.
या पालखी सोहळ्यात भाजपचे आमदार अमित गोरखे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी स्वतः पालखी रथाचे सारथ्य करत श्रद्धेचा अनुभव घेतला.
या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आमदार अमित गोरखे म्हणाले, "संत तुकाराम महाराजांची पालखी ही केवळ वारकऱ्यांची नव्हे, तर समस्त समाजासाठी एक अध्यात्मिक ऊर्जा आहे. वारी ही श्रद्धा, संयम आणि सामूहिक साधनेचे प्रतीक आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभाग घेतला, यामुळे शहराची संस्कृती आणि परंपरेवरील निष्ठा अधिक दृढ झाली आहे."
भक्ती-शक्ती चौकात महापालिकेच्या वतीने आयोजित स्वागत सोहळ्यात पालखीचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. महापालिका प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोहळ्याच्या स्वागतासाठी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. पालखीच्या आगमनाच्या वेळी पावसानेही आपली उपस्थिती दर्शवली, ज्यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहात आणखी भर पडली. हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आकुर्डी मुक्कामी मार्गस्थ झाले.
वारकऱ्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्य शिबिरे, पाणी व फराळ व्यवस्था, तसेच निवाऱ्याची सोय केली होती. शहरातील नागरिकांनीही या सेवाकार्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या शिस्तबद्ध व्यवस्थेचे वारकऱ्यांकडून मनापासून कौतुक करण्यात आले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sant Tukaram Palkhi, Pimpri-Chinchwad, Wari, Devotional Procession, Cultural Event, Maharashtra, Amit Gorkhe, Shankar Jagtap
#SantTukaramPalkhi #PimpriChinchwad #Wari #BhaktiShakti #MaharashtraCulture #PalkhiSohala

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: