१९ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने आणि ४.५ लाखांचे मोबाईल केले हस्तगत.
लातूर व सोलापूर जिल्ह्यातील महिला आणि झारखंडमधील पुरुषांचा समावेश असलेल्या टोळीला अटक.
पुणे शहर: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५ मध्ये वारकरी आणि भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल चोरी तसेच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय व परजिल्ह्यातील टोळीला पुणे शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे सुमारे २३ लाख ९१ हजार १३०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे शहर पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने २४ जून २०२५ रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पालखी सोहळ्यादरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरीचे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख यांनी गुन्हे शाखा युनिट ०५ आणि युनिट ०६, पुणे शहर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती केली होती. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार, गुन्हे शाखा युनिट ०५ व ०६ च्या पथकाने पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू केले.
पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे, अभिलेखावरील महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यांमध्ये १) चांदणी शक्ती कांबळे (वय ३२, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर), २) रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५, रा. उदगीर, जि. लातूर), ३) बबीता सुरज उपाध्ये (वय ५७, रा. उदगीर, जि. लातूर) आणि ४) पूजा धीरज कांबळे (वय ३५, रा. उदगीर, जि. लातूर) या महिलांचा समावेश होता. त्यांच्याकडे कौशल्याने तपास करून, त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मिनी गंठण व सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण १९,४१,३१०/- रुपये किमतीचे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९७/२०२५ (भा.न्या.सं.क. ३०४ (२)) व २) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. २८५/२०२५ (भा.न्या.सं.क. ३०३ (२)) हे दोन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच, पालखी सोहळ्यादरम्यान मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अरबाज नौशाद शेख (वय १९, रा. महाराजपूर, थाना तलझारी, जि. साहेबगंज, झारखंड) आणि एक १७ वर्षीय विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या कसून तपासामुळे ४,५०,०००/- रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण १४ मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९५/२०२५ (भा.न्या.सं.क. ३०३ (२)), २) हडपसर गु.र.नं. ५९६/२०२५ (भा.न्या.सं.क. ३०३ (२)) व ३) वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २७४/२०२५ (भा.न्या.सं.क. ३०३ (२)) असे एकूण तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखा पथकाने अशा प्रकारे एकूण २३,९१,१३०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेल्या मोबाईल आणि सोन्याच्या दागिन्यांच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. ज्या नागरिकांचे मोबाईल हॅण्डसेट किंवा महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने पालखी सोहळा दरम्यान चोरीस गेले आहेत, त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
याव्यतिरिक्त, दिनांक २० जून २०२५ रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेने एकूण २५ संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी १८ संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलम १२८ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून, उर्वरित ०७ विधी संघर्षित बालक असल्याने त्यांना संबंधित पोलीस स्टेशनने त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त, गुन्हे, पंकज देशमुख, उप-आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गुन्हे-२, राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ व युनिट ०६ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील निरीक्षक वाहिद पठाण, संजय पतंगे, सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे तसेच अंमलदार राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे व जावेद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
Palkhi Security, Theft Prevention, Crime Branch Pune, Interstate Gang, Gold Chain Snatching, Mobile Theft, Law Enforcement Success.
#PunePolice #CrimeBranch #PalkhiTheft #ChainSnatching #MobileTheft #PoliceSuccess #PuneCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: