मुंबई, ३० जून २०२५: भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा मोर्चातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या चव्हाण यांना संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने, ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपच्या राज्य परिषदेचे अधिवेशन उद्या, १ जुलै रोजी वरळी येथे होणार असून, या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल.
बावनकुळे यांच्या कार्याचे कौतुक:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचे कौतुक केले. बावनकुळे यांनी गेल्या तीन वर्षांत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलली असून, त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या मजबूत बांधणीमुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल:
रवींद्र चव्हाण यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मुंबई भाजप अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आमदार सुनील कांबळे, आमदार उमा खापरे आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री आणि या निवडणुकीसाठीचे निरीक्षक किरेन रिजिजू, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी खासदार अरुण सिंह यांच्याकडे रवींद्र चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती हे देखील उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया आणि पुढील टप्पे:
संघटन पर्वाअंतर्गत भाजपच्या सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षाच्या ८० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवडणूक झाली. त्यानंतर मंडल अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम २८ जून रोजी घोषित करण्यात आला होता. त्यानुसार आज, ३० जून रोजी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. उद्याच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल.
BJP, Maharashtra Politics, State President, Ravindra Chavan, Devendra Fadnavis, Political News, Party Election
#BJP #MaharashtraPolitics #RavindraChavan #DevendraFadnavis #StatePresident #PoliticalNews #MaharashtraBJP #PartyElection #Mumbai

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: