मुंबई, २६ जून २०२५: मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील विमान सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पक्षांच्या धडकेमुळे हवाई वाहतुकीला होणारा धोका कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने येत्या पंधरा दिवसांत वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण करून त्याला छप्पर टाकण्याची निविदा काढून तातडीने काम सुरू करावे, असे आदेश त्यांनी दिले. तसेच, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्यासाठी शास्त्रज्ञ, पर्यावरणविषयक तज्ज्ञ आणि तरुण अभ्यासकांकडून नव्या कल्पना आणि तंत्रज्ञान जाणून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बुधवारी (२५ जून) मुंबई विमानतळ परिसरात पक्षांच्या धडकेमुळे विमानांना होणारा धोका कमी करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ॲड. आशिष शेलार बोलत होते. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, मुंबई अग्निशमन दल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरली.
पक्षांच्या धडकेमुळे वाढता धोका आणि आकडेवारी
मुंबई विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात कचरा क्षेपणभूमी, कांदळवन किंवा वनक्षेत्र यामुळे पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामुळे विमान वाहतुकीला धोका निर्माण होत असतो. आकडेवारीनुसार, विमानाला पक्षी धडकण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे:
२०२० मध्ये २० घटना
२०२१ मध्ये ३५ घटना
२०२२ मध्ये ३६ घटना
२०२३ मध्ये ६० घटना
२०२४ मध्ये ५९ घटना
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत १९ घटना
ठाणे खाडी परिसरात येणाऱ्या परदेशी पक्षांमध्येही वाढ झाली असून, २०१५ मध्ये १० हजार फ्लेमिंगो आले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या २ लाखांपर्यंत पोहोचली आहे. पक्षांच्या धडकेची उंचीनुसार आकडेवारीही चिंताजनक आहे:
५० ते २०० फूट उंचीवर (२०२४ मध्ये) ३ धडका
५०० फुटांपर्यंत १६ धडका
५०० ते १००० फुटांपर्यंत १३ धडका
३ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर ११ धडका
मुंबईतील देवनार, कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंड आणि वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्र हे विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येतात. कचराभूमीत खाद्य मिळत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षांचा वावर असतो, ज्यामुळे विमानांना धोका पोहोचतो.
नव्या तंत्रज्ञानासाठी 'हॅकेथॉन'चे आयोजन
या समस्येवर उपाययोजना सुचवण्यासाठी मंत्री शेलार यांनी 'प्रॉब्लेम स्टेटमेंट' तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच, यावर उपाययोजनांसाठी शास्त्रज्ञ, उद्योजक, तरुण अभ्यासक आणि स्टार्टअप्सना आवाहन करून त्यांच्याकडून नवनवीन कल्पना मागवाव्यात आणि यासाठी 'हॅकेथॉन' आयोजित करावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या नवीन कल्पना येतील, त्यांचा अभ्यास पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने करून अहवाल तयार करावा. या अहवालाच्या अभ्यासातून उपाययोजना सुचवण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी किंवा राज्याच्या विमानतळ पर्यावरण समिती (AEMC) सोबत सल्लामसलत करावी, असे निर्देश ॲड. शेलार यांनी दिले.
वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण
विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे २ एकर क्षेत्रफळ असल्याने त्याचे आधुनिकीकरण करण्यात यावे. यामध्ये शेड कव्हर उभारणे, दुर्गंधी नियंत्रण प्रणाली स्थापने आणि मोबाईल कॉम्पॅक्शन युनिट स्थापणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठीच्या निविदा येत्या १५ दिवसांत काढून लवकरात लवकर काम सुरू करण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले.
या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिले की, विमानतळाच्या फनेल झोनमध्ये पक्षी दुर्घटनांसारख्या बाबींवर विचार करण्यासाठी असणारी विमानतळ पर्यावरण कमिटीची बैठक एप्रिल २०२४ नंतर झालेली नाही. त्यामुळे या संदर्भात पर्यावरण मंत्र्यांना लवकर बैठक घेण्याची विनंती करणार असल्याचेही मंत्री शेलार यांनी सांगितले. या समितीमध्ये पर्यावरण विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, मुंबई महापालिका आणि विमानतळावरील संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असतो.
Mumbai Airport Security, Bird Strikes, Ashish Shelar, Waste Management, Versova Transfer Station, Hackathon, Environmental Solutions, Aviation Safety, Mumbai Suburban Guardian Minister
#MumbaiAirport #BirdStrike #AviationSafety #AshishShelar #BMC #WasteManagement #Hackathon #EnvironmentalSolutions #Mumbai #AirportSecurity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: