पुणे, २२ जून २०२५: उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेची अवस्था आता धोकादायक आणि जीर्ण झाली असून, या जीर्ण झालेल्या पक्षात कोणाचीच राहण्याची तयारी नाही, अशी घणाघाती टीका भाजपा मुंबई अध्यक्ष व राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज (रविवार) केली. मुंबईकर, हिंदू सण, हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधी भूमिका घेतल्याने उबाठा गटाची ही अवस्था झाल्याचे शेलार यांनी नमूद केले.
उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेसेविका आकांक्षा शेट्टी यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश केला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. शेलार बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकरही उपस्थित होते.
भाजपा प्रवेशाचे कारण आणि पुढील 'अंक': शेलार म्हणाले की, गरीब कल्याण आणि विकासाची कास धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने श्री. तायडे आणि श्रीमती शेट्टी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. "प्रवेशाचा हा पहिला अंक आहे, पुढचा दुसरा अंक हा दमदार असेल आणि तिसरा अंक तर समारोपाचा असेल," अशा शब्दांत श्री. शेलार यांनी उबाठाला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आणि सरकार मुंबईकर व मुंबईच्या विकासासाठी झटत असून, मराठी माणूस किंवा देशहिताशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही श्री. शेलार यांनी स्पष्ट केले.
विकासकामे आणि महापालिकेतील स्थिती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि केंद्रातील मोदी सरकारच्या सहकार्याने मुंबईत जवळपास सात लाख कोटींची विकास कामे सुरू असल्याचा दावा शेलार यांनी केला. महाविकास आघाडीच्या सरकार असताना त्यांनी काय केले, हे सांगा किंवा थेट चर्चेला या, असे आव्हानही शेलार यांनी दिले. तांत्रिकदृष्ट्या मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या नगरसेवकांच्या आकड्याला पार करत भाजपा नंबर एकचा पक्ष बनल्याचेही श्री. शेलार यांनी सांगितले.
आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना, श्री. तायडे आणि श्रीमती शेट्टी भाजपाची विचारधारा जनमानसांपर्यंत रुजवतील, असा विश्वास व्यक्त केला. आंबेडकरी जनतेचे उदयोन्मुख नेतृत्व असलेले श्री. तायडे यापुढे भाजपाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा प्रचार-प्रसार करतील, असेही दरेकर म्हणाले.
'सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न': पक्षातील कार्यकर्ते, समर्थक, नेते, मतदार टिकत नाहीत म्हटल्यावर उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. "त्यासाठी भाजपा आम्हाला संपवू पहातेय अशी भाषा उद्धव ठाकरे वापरत आहेत. पक्षाची जीर्णावस्था रोखण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे," असे शेलार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. "आम्ही कोणाला संपवायला राजकारणात आलेलो नाही. मुंबईचा विकास, सेवा यासाठी भाजपा काम करत असून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन हेच आमचे ध्येय आहे," असेही त्यांनी नमूद केले.
Ashish Shelar, BJP Mumbai President, Cultural Minister, Uddhav Thackeray Faction (UBT Sena), Ishwar Tayade, Akanksha Shetty, BJP Entry, Praveen Darekar, Mumbai Development, Narendra Modi, Devendra Fadnavis, Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Corruption, Hindutva, Balasaheb Thackeray.
#AshishShelar #BJP #UddhavThackeray #MumbaiPolitics #Maharashtra #PoliticalNews #BJPEntry #MumbaiDevelopment
Reviewed by ANN news network
on
६/२२/२०२५ ०४:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: