पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान, मुंबई-नवी मुंबई होणार आंतरराष्ट्रीय शिक्षण हब
मुंबई, दि. १४ जून २०२५: भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज आता कमी होणार आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत (NEP) पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र (Letter of Intent - LoI) प्रदान केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई आणि नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हॉटेल ताज येथे 'मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या पाच जागतिक विद्यापीठांना आशयपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी, अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी, अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हॅंकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, तसेच विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जगातील पाच नामवंत विद्यापीठे महाराष्ट्रात:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड, यू.के.), युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यू.के.), युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात, विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभी राहणार आहेत. याच परिसरात येत्या काही वर्षांत मेडिसिटी, स्पोर्टस् सिटी आणि इनोव्हेशन सिटी देखील उभारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठे एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्याचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखला जाईल. मुंबईची सध्या वित्तीय, औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. या विद्यापीठांमुळे मुंबईला 'एज्युकेशनल सिटी' अशी नवी ओळख मिळेल आणि 'विकसित भारत २०४७' च्या उद्दिष्टात हा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा टप्पा:
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत असा हा भारतातील पहिलाच उपक्रम असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूच्या उभारणीमुळे पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी विद्यापीठांशी निगडित सर्वांना उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांनी भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही, त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही. सध्या पाच विद्यापीठे आली असली तरी, भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करण्यास राज्य शासन तयार आहे. नुकताच वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना विद्यापीठात सामंजस्य करार झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विकसित भारतासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, मुंबई ही स्वप्नांची नगरी आणि आर्थिक राजधानी असून, आगामी काळात शिक्षणाचे केंद्र (हब) होण्यासाठी या पाच परदेशी विद्यापीठांचे महत्त्वाचे योगदान राहील. भारत प्राचीन काळापासून शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर नावलौकिक असलेला देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारता'चे स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरील विद्यापीठांना भारतात संस्था सुरू करता येणार आहेत, तसेच भारतातील शिक्षण संस्थांना परदेशात शाखा उघडणे शक्य होणार आहे. यामुळे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात उपलब्ध होईल. भारतातील आयआयटी, आयआयएम, सिम्बॉयसिस यासारख्या संस्था परदेशात सुरू झाल्या असून, परदेशी विद्यापीठे भारतात येऊन शिक्षण देणार असल्याने भारताला विकसित बनवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
यावेळी गुजरात अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ढवसे यांनी सूत्रसंचालन केले, तर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबईत येणाऱ्या जागतिक दर्जाच्या पाच विद्यापीठांची ओळख:
- युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (यूके): यूकेमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ. २०० हून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांशी त्यांचे अनेक दशकांपासूनचे सहकार्य आहे, ज्यात आयआयटी, एम्स, मणिपाल अकादमी, आयसीएआर, आयसीएमआर आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे.
- युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया): जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आणि प्रतिष्ठित 'ग्रुप ऑफ एट' (Go8) विद्यापीठांमध्ये मुंबईत कॅम्पस स्थापन करणारे पहिले ऑस्ट्रेलियन विद्यापीठ. भारतीय विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विज्ञान, औद्योगिक व अभियांत्रिकी (STEM) तसेच व्यवसाय विषयांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असतील.
- यॉर्क विद्यापीठ (यूके): यूकेमधील सर्वात प्रतिष्ठित संशोधन-केंद्रित संस्थांपैकी एक आणि रसेल ग्रुपची सदस्य. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशील उद्योगांसह संगणक विज्ञानातील अत्याधुनिक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध होतील. उदयोन्मुख क्षेत्रातील कार्यक्रम जागतिक उद्योगांच्या सहभागातून डिझाइन केले जातील, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
- इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक, अमेरिका): स्वतंत्ररित्या पदवी देणारे आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ. संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय यासारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदवीधर शिक्षण उपलब्ध होईल. त्यांचा प्रसिद्ध 'एलिव्हेट प्रोग्राम' देखील राबवला जाईल, जो सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन आणि स्पर्धा उपलब्ध करून देईल.
- इस्तितुतो युरोपियो दी डिझाईन (IED, इटली): युरोपमधील प्रीमियम डिझाईन शाळांपैकी एक. फॅशन, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य उपलब्ध करून देईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: