पुणे: मित्रांसोबत का फिरतो या निरर्थक प्रश्नावरून झालेल्या वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीवर सात जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली आहे. आरोपींनी दगड आणि धारदार हत्यारे वापरून हल्ला करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपींपैकी महेश विकास शिंदे (वय २०, रा. स.नं. ११०, रामटेकडी, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात केली असून सहा जण अद्याप फरार आहेत.
ही गंभीर घटना ३१ मे २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रामटेकडी, हडपसर येथे घडली. पीडित ४५ वर्षीय व्यक्तीने (रा. हडपसर, पुणे) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रांसोबत असताना आरोपींनी त्यांना अडवले. "तू तुझ्या मित्रांबरोबर का फिरतो?" असा अनावश्यक प्रश्न विचारत आरोपींनी फिर्यादीशी वाद सुरू केला. त्यानंतर आरोपींनी आपापसात कट रचून बेकायदेशीर जमाव तयार केला.
टोळक्याने हातात दगड आणि धारदार हत्यारे घेऊन पीडितावर एकत्रितपणे हल्ला चढवला. त्यांना दगडांनी आणि हत्यारांनी मारहाण करून गंभीर जखमा केल्या. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(१), १९१(२), १९१(३), ३५१(२), आर्म्स ऍक्ट कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
#PuneCrime #GangViolence #AssaultCase #WanowrieNews #StreetCrime #GroupAttack #PunePolice #CriminalCase #ViolentCrime #PublicSafety #GangWar #CrimeNews #Maharashtra #HadapsarNews #ArrestNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: