ए एन एन न्यूज नेटवर्क
दिनांक २८ मे २०२५
आजचे बातमीपत्र
उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
आषाढी वारी स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात
हंगा नदीच्या पुलासाठी खरातवाडीत आंदोलन; हेलिकॉप्टरची मागणी
तीन सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना ’रंगेहाथ’ पकडले!
विकास आराखड्याला अंतिम रूप देताना लोकांचा विश्वास महत्त्वाचा - आमदार शंकर जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण
-- ------------------------------
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांमधील शेकडो कर्मचाऱ्यांनी काल मुंबईत भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. इंडिगो, स्पाइसजेट, बीडब्ल्यूएफएस आणि एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनांच्या सदस्यांनी उबाठा सेनेकडून झालेल्या अन्यायाला कंटाळून भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले.
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी पिंपरी-चिंचवडमध्ये अंतिम टप्प्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (२७ मे) पालखी मार्गाची पाहणी केली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी पिंपरी चिंचवडमध्ये आगमन होणार असून या दिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवडमध्ये २० जून रोजी आगमन होणार असून त्याच दिवशी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही सोहळ्यांच्या स्वागत आणि नियोजनासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन सूक्ष्म नियोजन करत आहे..
पिंपळगाव पिसा नजिकच्या खरातवाडी आणि परिसरातील नागरिकांचे जीवन हंगा नदीवर पूल नसल्याने अडचणीत आले आहे. पहिल्याच पावसाने तात्पुरता पूल वाहून गेल्याने अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला असून प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टर सेवेची उपहासगर्भ मागणी केली आहे.
खरातवाडी, एरंडोली, इथापे मळा, टेकाड वस्ती आणि काठेवाडी वस्ती या गावांना पुलाअभावी मूलभूत सुविधा मिळणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले असून शेतकऱ्यांच्या जनावरांची वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पूल बांधण्याची मागणी केली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी खरातवाडी-एरंडोली रस्त्यावर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे..
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सोमवारी (२७ मे २०२५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अँटी करप्शन ब्युरो) मोठी कारवाई करत तीन सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि कोषागार कार्यालयातील शिपाई मारुती भोसले यांचा समावेश आहे. एका नागरिकाकडून त्याने खरेदी केलेल्या जमिनीची फ़ेरफ़ार नोंदणी करण्यासाठी या तिघांनी एकदा पंचेचाळीस हजार लाच घेतली.पण पूर्ण पैसे मिळाले नाहेत असे कारण दाखवून पुन्हा लाच मागितली. ती घेताना हे तिघे पकडले गेले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी प्रेरणा शाळा मैदान, भोंडवे नगर येथे भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना आमदार जगताप म्हणाले की, विकास आराखड्याला अंतिम रूप देताना नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यात १२, १५ आणि २४ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित आहेत. यामुळे अनेक नागरिकांच्या घरांवर परिणाम होणार असून काहींना विस्थापित होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या हरकती व सूचना नोंदवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी रवींद्र हरिश्चंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार आणि खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण विभागीय अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.
बातमीपत्र संपले. धन्यवाद!
ए एन एन न्यूज नेटवर्क दिनांक २८ मे २०२५ आजचे बातमीपत्र (PODCAST)
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०८:०५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०८:०५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: