ए एन एन न्यूज नेटवर्क पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेविषयक बातमीपत्र
दिनांक ३० मे २०२५ सायंकाळी ७ वाजता
पुणे
शहर आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही शहरांमध्ये गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या अनेक गंभीर घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये ऑनलाइन फसवणूक, खून, दरोडा, घरफोडी, चोरी, मारहाण आणि अपघात अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.पुणे शहर:
पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या दोन मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, एका ३८ वर्षीय महिलेला ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने तब्बल ४३ लाख ९१हजार १६० रुपयांना गंडा घालण्यात आला. ही घटना ३ मे ते ८ मे दरम्यान घडली. याप्रकरणी मोबाईल धारक आणि लिंकधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत.
सिंहगड रोड पोलिस ठाण्यात देखील अशाच प्रकारे ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एका ४७ वर्षीय व्यक्तीची ९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे तपास करत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी अद्याप फरार आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० मे रोजी रात्री ९ वाजता प्रीती सचिन वाखारे, या ३१ वर्षीय महिलेचा, धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत.
याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ मे रोजी एका ३४ वर्षीय व्यक्तीच्या घरात घुसून चार पुरुष आणि एका महिलेने मारहाण करत रोख रक्कम, फोन पे द्वारे पैसे, लॅपटॉप आणि कागदपत्रे असा एकूण १लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली. सहायक पोलिस निरीक्षक परदेशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ मे रोजी पहाटे एका झेरॉक्स दुकानाचे शटर उचकटून ६ लाख रुपये किमतीचे प्रिंटिंग हेड चोरण्यात आले.
फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ मे रोजी दिवसा बंद घराचे कुलूप तोडून १लाख ९० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यात आले.
स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ मे रोजी एका ७६ वर्षीय प्रवाशाच्या गळ्यातील ९५ हजार रुपयांची सोन्याची चैन बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरण्यात आली.
या सर्व प्रकरणांमध्ये आरोपी अज्ञात असून पोलिस तपास करत आहेत.
बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ मे रोजी दुपारी पुणे स्टेशनजवळ एका अज्ञात वाहनाने ५२ वर्षीय सिद्धार्थ नामदेव गवारे यांना धडक देऊन गंभीर जखमी केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. वाहनचालक अपघातानंतर पळून गेला असून पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हेगारीच्या विविध घटनांची नोंद झाली आहे.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जेसीबी व्यवहारातून ११लाख ७० हजार रुपयांची फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शशांक हगवणे आणि एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २० मार्च २०२२ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडली. पोलिस उपनिरीक्षक जायभाये तपास करत आहेत.
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे. पहिल्या घटनेत स्विफ्ट डिझायर चालक आशिष जगताप याने बलेनो गाडीला, तर दुसऱ्या घटनेत संजय जाधव या टाटा पंच चालकाने अर्बन क्रूझर गाडीला धडक दिली. दोन्ही प्रकरणांत चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम साईटवरून लोखंडी साहित्य चोरताना दत्ता सारगे, तन्मय दळवी आणि एका महिलेला पकडण्यात आले असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. आरोपी १ आणि २ यांना अटक करण्यात आली आहे.
संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना विशाल निकाळजे आणि रियाज शेख यांना २६ हजार ६२२ रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कंपनीने बक्षीस म्हणून दिलेल्या गाड्या स्वतःच्या नावावर न करता विश्वासघात केल्याप्रकरणी ७ वैद्यकीय प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २००१ पासून सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्वेता घोरपडे-शिंदे तपास करत आहेत.
कौटुंबिक वादातून मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घराच्या वादातून वडिलांनी दगड मारल्याने, भावांनी काठीने मारहाण केल्याने आणि बहिणीने डोळ्यात चटणी टाकल्याने सचिन कराडे हे जखमी झाले.
निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरासमोर चूल पेटवण्याच्या कारणावरून अभिजित जगताप या शेजाऱ्याने एका महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना प्लास्टिक पाईपने मारहाण केली.
चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैभव इंगळे या बस चालकाने गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून विजय गायकवाड यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ऑटो रिक्षा चालकाने पादचारी ब्रिजेश शर्मा यांना धडक देऊन जखमी केले आणि तो पळून गेला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: