अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे: हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांच्यासह पाच जणांवर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
बावधन पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ५७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५०), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय २४) आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (वय ५१, रा. संतकृपा निवास, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असून, २००४ मध्ये त्यांनी मुळशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद कस्पटे यांची मुलगी वैष्णवी आणि भूकुम येथील शशांक हगवणे यांच्यात प्रेमसंबंध होते. राजेंद्र हगवणे यांनी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देऊन सनीज वर्ल्ड येथे लग्न करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २८ एप्रिल २०२३ रोजी लग्न झाले.
लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक आणि सासू-सासरे वैष्णवीला घरातील किरकोळ कामांवरून वाद घालत मारहाण करत होते. ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती असताना शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक त्रास दिला आणि घरातून हाकलून दिले. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी हुंड्याच्या पैशांसाठी वैष्णवीने विषारी औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शशांकने जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती आणि पैसे न दिल्यास वैष्णवीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मार्च २०२५ मध्ये वैष्णवीला वाकडला आणून सोडण्यात आले.
१६ मे रोजी वैष्णवीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या प्रकरणात अधिक कलमे वाढवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------------
#DowryDeath #PuneCrime #Suicide #RajendraHagwane #PoliceInvestigation #MaharashtraCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा