मुंबई, १७ मे २०२५: सुमारे ११० वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या हिंदुजा उद्योग समूहाने ‘संडे टाइम्स रिच लिस्ट-२०२५’ मध्ये ३५.३ अब्ज पौंड्सच्या मालमत्तेसह ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून आपले पहिले स्थान चौथ्या वर्षीही कायम राखले आहे. जी.पी. हिंदुजा यांच्या नेतृत्वाखालील या बहुराष्ट्रीय उद्योग समूहाने जागतिक स्तरावर आपले व्यावसायिक सामर्थ्य आणि नेतृत्व सिद्ध केले आहे.
‘संडे टाइम्स रिच लिस्ट’ ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांचे वार्षिक मानांकन असून, २०२५ च्या यादीत ३५० नावांचा समावेश आहे. जागतिक स्तरावरच्या अनेक आव्हानांना आणि धोरणात्मक बदलांना यशस्वीरित्या तोंड देत हिंदुजा कुटुंबाने हे यश मिळवले आहे.
ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले हिंदुजा कुटुंब वाहन निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग आणि आर्थिक सेवा, प्रसार माध्यम, प्रकल्प विकास, लुब्रिकंट्स व विशेष रसायने, ऊर्जा, रिअल इस्टेट, व्यापार आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये ३८ देशांमध्ये कार्यरत आहे.
विशेष म्हणजे, हिंदुजा समूहाने मागील वर्षभरात भारतात विद्युत वाहन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंगच्या पायाभूत सुविधांमध्येही समूहाने गुंतवणूक केली आहे. हे शाश्वत आणि भविष्यकालीन दृष्टिकोनातून उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत असतानाच हिंदुजा कुटुंबाने सामाजिक कार्यामध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जल संवर्धन यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक प्रभावी उपक्रम राबविले जात आहेत, ज्याचा सकारात्मक परिणाम विविध भौगोलिक क्षेत्रांतील समुदायांवर होत आहे.
‘संडे टाइम्स रिच लिस्ट २०२५’ मध्ये हिंदुजा कुटुंबासोबतच डेव्हिड आणि सायमन रुबेन कुटुंब, सर लिओनार्ड ब्लावातनिक, सर जेम्स डायसन आणि कुटुंब, इदन ओफेर, गाय, जॉर्ज, आलनाह आणि गॅलन वेस्टन कुटुंब, सर जिम रॅटक्लिफ आणि लक्ष्मी मित्तल कुटुंब यांचाही समावेश आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
Hash tags: #Hinduja #UKRichList #SundayTimesRichList #Wealth #BusinessNews #IndiaEV

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा